टीम लोकमन मंगळवेढा |
जानेवारी महिन्यातच उणे झालेले उजनी धरण 25 जुलैपर्यंत उणे पातळीमध्येच होते. पुणे जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरण आता 90 टक्क्यांपर्यंत आले आहे. धरणातील एकूण पाणीसाठा आता 110 टीएमसी इतका झाल्याचे पाहायला मिळत आहे.
उजनी धरणात सध्या दौंडवरुन 75 हजार क्युसेकने पाण्याची आवक येत आहे. त्यामुळे धरणातून डावा- उजवा कॅनॉल, बार्शी, दहीगाव उपसा सिंचन योजना, बोगदा, सीना नदीतून पाणी सोडले जाणार आहे. विसर्ग असाच राहिला किंवा यापेक्षा वाढला तर भीमा नदीतूनही पाणी सोडले जाईल असे जलसंपदा विभागाने सांगितले आहे. यामुळे प्रशासनाकडून भीमा, सीना नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
उजनी धरणात सध्या उपयुक्त पाणीसाठा 46 टीएमसीपर्यंत (90 टक्क्यांपर्यंत) पोहचला आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात अद्यापहि समाधानकारक पाऊस झाला नाही. उजनी धरण परिसरात देखील कमी पाऊस झाला आहे.
परंतु पुणे जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे धरण आता 100 टक्क्याकडे वाटचाल करीत असल्याचे सद्य: स्थितीत पाहायला मिळत आहे. सध्या जेवढा अपेक्षित साठा पाहिजे तेवढा साठा झालेला आहे. उजनी धरणावर पुणे, अहिल्यानगर, धाराशिव व सोलापूर अशा चार जिल्ह्यांच्या तब्बल 42 पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत.
धरणाचा आधार असल्याने सोलापूर जिल्ह्यात केळी, डाळींब, ऊस अशा पिकांची व फळबागांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील एक लाख 62 हजार हेक्टर जमिनीला उजनीतून थेट पाणी मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यात उजनी धरणाचा फार मोठा वाटा आहे. उजनी धरणामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या घरात समृद्धी आल्याने त्यांचे राहणीमानही उंचावले असल्याचे चित्र आहे. यामुळे तरुण शेतकऱ्यांची लाईफस्टाईल बदलण्याची पाहायला मिळत आहे.
आता धरणातून खाली पाणी सोडले जाणार आहे. पुण्यातील मुसळधार पाऊस, धरणातील पाणीसाठा आणि पावसाळा अजून 2 महिने असल्याने तसा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. नदीतून सोडला जाणारा विसर्ग वाढविण्यापूर्वीच नदीकाठी असलेल्या लोकांना सुरक्षितस्थळी घेऊन जाणे गरजेचे आहे. पुढे पाऊस अजून 2 महिने पडणार आहे. त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आले असून, जिल्हा प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून दक्षता घेतली जात आहे.
गतवर्षी उजनी धरण 66 टक्केच भरले आणि उन्हाळ्यात उणे 60 टक्के झाले…
गतवर्षी सोलापूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाला होता. पुणे जिल्ह्यातही समाधानकारक पाऊस झाला नव्हता. त्यामुळे उजनी धरण 66 टक्केच भरले होते. उन्हाळ्यात उजनी धरणातील पाणीसाठा धरण झाल्यापासून पहिल्यांदाच उणे 60 टक्क्यांपर्यंत पोचला होता. पाऊस लांबला असता तर जिल्ह्यातील पाणीटंचाई अधिकच तीव्र झाली असती, अशीच स्थिती होती. परंतु यंदा पावसाळा दोन महिने शिल्लक असतानाही पुण्यातील पावसामुळे उजनी धरण एकाच महिन्यात 90 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.