टीम लोकमन मंगळवेढा |
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सोलापूरमध्ये पुन्हा मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी आपल्या पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच अजितदादांना सोलापूरमध्ये मोठा धक्का बसला आहे. दीपक आबा साळुंखे यांच्या राजीनाम्यामुळे ते अपक्ष लढणार की ‘मशाल’ हाती घेणार? याबाबत तर्कवितर्क काढले जात असून चर्चांना तालुक्यात उधाण आले आहे.
दीपक आबा साळुंखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन विधानसभेची आगामी निवडणूक अपक्ष लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. सांगोल्यात मी शेतकरी कामगार पक्ष आणि आमदार शहाजीबापू पाटील यांना मदत केली आहे. त्यामुळे त्यांनी आता आपल्याला संधी द्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय व माजी आमदार दीपक आबा साळुंखे यांनी सांगोल्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन जनता हाच माझा पक्ष आहे. तालुक्यातील जनतेने मला निवडणुकीत उभे राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी मी उमेदवार असणार आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचाही राजीनामा देत असल्याचे दीपक साळुंखे यांनी यावेळी सांगितले.
दीपक आबा साळुंखे म्हणाले की, गेली 30-35 वर्षे राजकीय जीवनामध्ये प्रथमतः शेतकरी कामगार पक्षाचे ऋषितुल्य नेतृत्व दिवंगत गणपतराव देशमुख यांना आमदार करण्यात माझी महत्वाची भूमिका राहिली आहे. मी व माझ्या पक्षातील कार्यकर्त्यांनी त्यावेळी गणपतराव देशमुख यांचा प्रचार केला होता. त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मी पक्षभेद विचारुन आमदार शहाजी पाटील यांनाही मदत केली होती.
सांगोला तालुक्यातील या दोन्हीही पक्षातील नेतेमंडळींना माझे आवाहन आहे की यावेळी आमदार शहाजी पाटील व डॉ. अनिकेत देशमुख व डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मला मदत करावी. मी कोणत्याही परिस्थितीत यावेळी जनतेचा उमेदवार म्हणून निवडणूक लढविणार आहे. या पुढील काळात राजकीय पक्षातील कोणी मदत करण्यात तयार असल्यास मी त्याचाही निश्चितपणे विचार करेन असेही साळुंखे यांनी सांगितले.
माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनदादा शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांची साथ सोडली आहे. बबनदादा शिंदे यांनी आपला मुलगा विधानसभेची आगामी निवडणूक लढविणार असून तो शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळाली तर तुतारीवर नाही मिळाली तर अपक्ष निवडणूक लढवेल अशी घोषणा खुद्द बबनदादा शिंदे यांनी यापूर्वीच केली आहे. याशिवाय करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांनीही विधानसभेची आगामी निवडणूक अपक्ष लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे महायुतीमध्ये असलेल्या अजित पवार यांची जागा वाटपावेळी कसोटी लागणार आहे.
अजितदादांचे सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख सहकारी असलेले आमदार बबनदादा शिंदे, आमदार संजयमामा शिंदे हे सुद्धा सध्या पक्षापासून चार हात लांबच आहेत. आज पक्षाचे जिल्हाध्यक्ष दीपकआबा साळुंखे पाटील यांनी राजीनामा दिला असतानाच पक्षाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनीही आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली आहे. यामुळे दादांच्या राष्ट्रवादीला सोलापूर जिल्ह्यात मोठे खिंडार पडल्याचे पाहायला मिळत आहे. उमेश पाटील तुतारी हाती घेणार असल्याची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. उमेश पाटलांनी तुतारी हाती घेतल्यास त्यांचे जिवलग मित्र असलेले व पक्षाचे प्रदेश सरचिटणीस म्हणून धुरा सांभाळणारे लतीफभाई तांबोळी काय भूमिका घेतात? याकडेही राजकीय जाणकारांचे लक्ष आहे.