जत : पांडुरंग कोळळी
जत कृषी कार्यालयाच्या अनागोंदी कारभाराच्या विरोधात भाजपच्यावतीने कृषी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चादरम्यान अधिकाऱ्यांना घेराव घालून धारेवर धरण्यात आले. भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तमनगौडा रवीपाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. त्याला तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला.
शेतकऱ्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात भाजपच्या वतीने विराट मोर्चा व घेराव आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी सकाळी 11 वाजता येथील महात्मा बसवेश्वर चौक येथे महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आंदोलनास सुरुवात करण्यात आली. भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तमनगौडा रवीपाटील उमदी येथील शिवसेनेचे नेते निवृत्ती शिंदे, सरकार पाणी संघर्ष समितीचे नेते सुनील पोतदार, सरपंच परिषदेचे माजी अध्यक्ष बसवराज पाटील, भाजप अनुसूचित जाती जमाती सेलचे जिल्हा अध्यक्ष हनुमंत गडदे, नगरसेवक टीमू एडके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. हा मोर्चा बसवेश्वर चौकपासून कृषी अधिकारी कार्यालयावर पोहचला.
तालुका कृषी कार्यालयासमोर झालेल्या सभेत बोलताना तमनगौडा रवीपाटील म्हणाले, शासनाने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी तालुका व मंडळ स्तरावर कृषी कार्यालयांची स्थापना केली आहे. मात्र येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अनागोंदी कारभारामुळे शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. यावर्षी चांगला पाऊस पडूनही शेतकऱ्यांना बियाणे मिळू शकत नाहीत. अनेक शासकीय योजना फळबाग लागवडीचे अनुदाने व प्रस्ताव व्यवस्थित केले जात नाहीत. शेतकऱ्यांना कार्यालयाकडे हेलपाटे घालावे लागतात. सर्व मंडल कार्यालयाचा कारभार हा जत मध्ये बसून केला जातो. ही मंडल कार्यालये नेमून दिलेल्या ठिकाणी सुरू करण्यात यावीत. तसेच सर्व अधिकारी कर्मचारी यांनी तालुक्यातील प्रत्येक तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचून सेवा देण्यात यावी. जत तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यावर होणारा अन्याय यापुढे अजिबात खपवून घेतला जाणार नाही असा इशारा दिला.
यावेळी बोलताना बसवराज पाटील यांनी शेतकऱ्यांना ताबडतोब न्याय मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली. विविध मागण्यांचे निवेदन तालुका कृषी अधिकारी प्रदीप कदम यांना देण्यात आले. निवेदनात जत तालुक्यात अनेक वर्षे ठाण मांडून बसलेले अधिकारी व कर्मचारी यांच्या तातडीने तालुक्याबाहेर बदल्या करण्यात याव्यात. मंडल कृषी कार्यालयांचा कारभार नेमून दिलेल्या ठिकाणी सुरू करण्यात यावा. कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक यांनी नेमून दिलेल्या गावांना नियमित गावभेटी कराव्यात. भाऊसाहेब फुंडकर योजनेतील फळबाग लाभार्थींना तातडीने निधी देण्यात यावा. रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवड योजनेचे प्रस्ताव तातडीने मंजूर करावेत. खते व बियाणांचे वितरण तालुका कार्यालयातून न करता गाववार करण्यात यावे. कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती प्रत्येक ग्रामपंचायतच्या फलकावर लावण्यात यावी.
या मागण्यांचा समावेश होता.
सर्व मागण्या मान्य होऊन शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबलाच पाहिजे. अशी ठाम भूमिका कृषी अधिकाऱ्यांसमोर मांडली. यावर कृषी अधिकाऱ्यांनी या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य नागेश सोनूर, आसंगी तुर्कचे सरपंच मिरासाहेब मुजावर, बाजचे माजी सरपंच संजय गडदे, जाडरबोबलादचे सरपंच रामलिंग निवर्गी, नवाळवाडीचे सरपंच अमोल शेटे, नवाळवाडीचे उपसरपंच लहू सूर्यवंशी, सोरडीचे सरपंच तानाजी पाटील, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस कामन्ना बंडगर, भाजपा किसान मोर्चा जिल्हा सदस्य कुमार जैन, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सदस्य चिदानंद संती, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सदस्य अतुल गुजले, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सदस्य प्रदीप जाधव, भाजपा विद्यार्थी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष पिरगोंडा कोळी, भाजपा विद्यार्थी आघाडी जत तालुकाध्यक्ष विशाल महारनूर, भाजपा किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष रावतराय तेली, युवक नेते विठ्ठल मसळी, युवक नेते संजय नेमाणे, युवक नेते नरेंद्र कोळी, युवक नेते संजय सवदे, युवक नेते शरद हिप्परकर, युवक नेते सचिन निकम, सुरेश पाटील उपस्थित होते.