टीम लोकमन मंगळवेढा |
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध करत ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी गेल्या 9 दिवसांपासून जालन्यातील वडीगोद्री येथे उपोषण सुरू केले आहे. हाके यांनी हे उपोषण मागे घेण्यासाठी सरकारचे शिष्टमंडळ आज त्यांना भेटण्यासाठी आले होते. यावेळी सरकारने लक्ष्मण हाके यांच्या मागण्या मान्य केल्या असून, त्यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी बोलताना हाके म्हणाले, “दहा दिवस झाले तरी आमच्या आंदोलनाकडे कोणीही फिरकले नव्हते. त्यामुळे आम्हाला नेहमी डावलले जात असल्याची भावना राज्यातील ओबीसींमध्ये निर्माण झाली आहे.
कुणबींना मराठा समाजातील ‘सगे सोयरे’ म्हणून मान्यता देणारी महाराष्ट्र सरकारची मसुदा अधिसूचना रद्द करण्याची मागणी ओबीसी कार्यकर्ते प्रा. लक्ष्मण हाके यांनी केली होती. त्याचबरोबर जातीच्या दाखल्याची पॅन आणि आधार कार्डशी नोंदणी करण्यात यावी. अशी त्यांची मागणी होती.
मराठीत ‘सगे सोयरे’ या शब्दाचा अर्थ जन्मजात आणि विवाहाद्वारे नातेसंबंध असा होतो. महाराष्ट्रात कुणबी समाजाला ओबीसी प्रवर्गांतर्गत आरक्षनाचा लाभ मिळतो.
हाके यांना भेटण्यासाठी गेलेल्या राज्य सरकारच्या शिष्टमंडळात आमदार गोपिचंद पडळकर यांचाही समावेश होता. यावेळी बोलताना ते म्हणाले,”सगे सोयरे” हा शब्द अस्तित्वात नसल्याची सरकारची ठाम भूमिका आहे.
सरकारच्या शिष्टमंडळात सरकारमधील महत्त्वाचे मंत्री असलेल्या छगन भुजबळ यांचाही समावेश होता. वडीगोद्री येथे बोलताना भुजबळ म्हणाले, “आम्ही कुणालाही धमक्या देत नाही आणि कुणालाही भीत नाही. परंतु निवडणुकीच्या काळात आणि निवडणुकीनंतरही आमच्या ओबीसी बांधवांच्या घरावर हल्ले झाले. आम्ही मागणी करत आहोत की, आमच्या ताटातील आरक्षण काढून घेऊ नका. त्यांना काही द्यायचे आहे ते द्या.”