टीम लोकमन मंगळवेढा |
मंगळवेढा येथील श्री संत दामाजी महाविद्यालयामध्ये कौशल्य विकास केंद्रांतर्गत दिनांक 28 ऑगस्ट 2024 ते 30 ऑगस्ट 2024 दरम्यान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी केक मेकिंगचे प्रशिक्षण संपन्न झाले. या प्रशिक्षणासाठी महाविद्यालयातील 65 विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला होता.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रोफे. डॉ. औदुंबर जाधव यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की येणाऱ्या काळामध्ये कौशल्य प्रशिक्षण हे विद्यार्थ्यांना करावे लागणार आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना प्रत्येक विद्यार्थ्यांनी कौशल्याचे शिक्षण घेणे देखील गरजेचे आहे. नवीन शैक्षणिक धोरणात सुद्धा या कौशल्य शिक्षणाला अनन्यसाधारण असे महत्त्व अभ्यासक्रमात देण्यात आले आहे. त्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा व आपले जीवन स्वयंपूर्ण व तसेच आर्थिक सक्षम बनवावे असेही महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य जाधव यांनी त्यांच्या मनोगतातून व्यक्त केले.
केक मेकिंग प्रशिक्षणासाठी मंगळवेढा तालुक्यातील प्रसिद्ध माधुरी गवळी यांनी विद्यार्थ्यांना सलग तीन दिवस अतिशय कौशल्यपूर्ण तसेच सहज व सोप्या पद्धतीने प्रशिक्षण दिले. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना काही तास थेरीचे व काही तास प्रॅक्टिकल अशा पद्धतीने हा कोर्स अतिशय यशस्वीरित्या व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद पाहायला मिळत होता.
हे प्रशिक्षण यशस्वी संपन्न करण्यासाठी महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख व कौशल्य विकास केंद्राचे समन्वयक प्रा. डॉ. जावेद तांबोळी, केक मेकिंग कोर्सच्या इन्चार्ज प्रा. सरिता भोसले, प्रा. डॉ. संजय क्षीरसागर, प्रा. डॉ. राजकुमार पवार, प्रा. सुधाकर राठोड, ट्रेनर माधुरी गवळी यांनी परिश्रम घेतले.