टीम लोकमन मंगळवेढा |
मंगळवार दिनांक 5 नोव्हेंबर रोजी मंगळवेढा तालुक्याचे ज्येष्ठ नेते व सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी व्हाईस चेअरमन बबनराव आवताडे यांनी आपल्या गटाची विचारविनिमय बैठक आयोजित केली आहे.
मंगळवार दिनांक 5 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता पंढरपूर बायपास रोड नजीक असणाऱ्या जोगेश्वरी मंगल कार्यालयात पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणूक 2024 संदर्भात विचार विनिमय करण्यासाठी व पुढील दिशा ठरवण्यासाठी आवताडे गटाच्या विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
सोलापूर जिल्ह्याचे नेते, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी व्हाईस चेअरमन व आवताडे गटाचे प्रमुख बबनराव आवताडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीमध्ये श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे संचालक सिद्धेश्वर आवताडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन सुशील आवताडे, युवा उद्योजक शैलेश आवताडे हे मार्गदर्शन करणार आहेत.
मंगळवेढा तालुक्याच्या सहकार क्षेत्रावर बबनराव आवताडे यांचे गेल्या काही दशकांपासून निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. मंगळवेढा तालुक्यातील अपवाद वगळता सर्वच विकास सोसायट्यांवर बबनराव आवताडे गटाचे निर्विवाद वर्चस्व आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती, मंगळवेढा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ, कृषी उद्योग संघ, संत दामाजी पतसंस्था, श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना, आदी तालुक्यातील शेतकऱ्यांची निगडित संस्थांमध्ये आवताडे गटाची सत्ता आहे.
मंगळवेढा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये देखील आवताडे यांचे समर्थक विविध पदांवर कार्यरत आहेत. मंगळवेढा शहरालगतची व तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दामाजी नगर ग्रामपंचायतींवर बबनराव आवताडे गटाचे निर्विवाद वर्चस्व आहे. शहरालगतच्या दुसऱ्या मोठ्या संत चोखामेळा नगर ग्रामपंचायत मध्ये सुद्धा बबनराव आवताडे यांच्या विचाराचे सदस्य आहेत.
संपूर्ण मंगळवेढा तालुक्यात बबनराव आवताडे यांचा आदरयुक्त दबदबा आहे. त्यांना मानणारा तालुक्यात मोठा वर्ग आहे. त्यांचे सुपुत्र व संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे संचालक सिद्धेश्वर आवताडे यांची युवकांमध्ये मोठी क्रेझ आहे. संपूर्ण मंगळवेढा तालुक्यासह लगतच्या काही तालुक्यांमध्ये युवकांचे मोठे जाळे त्यांनी निर्माण केले आहे. मंगळवेढा तालुक्यातील युवक सिद्धेश्वर आवताडे यांना सरकार या नावाने संबोधतात. युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते राऊंड द क्लॉक कार्यरत असतात. मंगळवेढा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ म्हणजे मंगळवेढा तालुक्यातील जनतेला आपले गाऱ्हाणे हक्काने मांडण्याचे केंद्र बनले आहे. या ठिकाणी तालुक्यातील जनतेच्या विविध प्रश्नांची सोडवणूक निर्विवादपणे केली जाते. तालुक्यातील युवकांना सिद्धेश्वर आवताडे यांचा मोठा आधार आहे.
संघावर गेल्यानंतर न्याय मिळतोच ही भावना आता तालुक्यातील जनतेची झाली आहे. आपल्या कार्यकर्त्याकडून देखील कुणावर अन्याय झाल्यास आपल्याच कार्यकर्त्याचा समाचार घेण्यास देखील सिद्धेश्वर आवताडे मागेपुढे पाहत नाहीत. ‘चुकीला माफी नाही’ याप्रमाणे अन्याय करणाऱ्याचा समाचार घेतला जातो. त्यामुळे संपूर्ण तालुक्यातील लोक आपले गाऱ्हाणे आणि समस्या घेऊन त्यांच्याकडे येत असतात. त्यामुळे तालुक्यातील घराघरात सिद्धेश्वर आवताडे यांचे नाव पोहोचले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत बबनराव अवताडे यांच्या गटाने महाविकास आघाडीला आपला पाठिंबा जाहीर केला होता. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा झंजावाती प्रचार आवताडे गटाने केला आणि प्रणिती शिंदे यांना मंगळवेढा तालुक्यातून मोठे मताधिक्य मिळाले. त्यामध्ये आवताडे गटाचा सिंहाचा वाटा राहिला आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये यांचा पाठिंबा ज्या पक्षाला किंवा ज्या उमेदवाराला असेल त्याचे पारडे जड राहणार आहे. त्यामुळे आवताडे यांच्या भूमिकेकडे दोन्ही तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
यापूर्वी सिद्धेश्वर आवताडे यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती परंतु त्यांना पराभव पत्करावा लागला होता. मंगळवेढा तालुक्यातील बबनराव आवताडे यांचे राजकीय वजन पाहता अनेक उमेदवारांनी त्यांना पाठिंब्यासाठी साकडे घातले आहे. लोकसभा निवडणुकीत आवताडे गटाने निर्णय घेण्यास विलंब केला होता. परंतु अल्प कालावधीत प्रणिती शिंदेंना तालुक्यातून मोठे मताधिक्य मिळवून देण्यात ते यशस्वी ठरले होते. विधानसभेला बबनराव आवताडे काय भूमिका घेतात? याकडे राजकीय जाणकारांच्या नजरा लागल्या आहेत. बबनराव आवताडे यांचा गट ज्या उमेदवाराला पाठिंबा देईल त्याचा विधानसभेचा मार्ग सुकर होणार हे निश्चित आहे.