मंगळवेढा: मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथील गाव यात्रेच्या निमित्ताने छत्रपती परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मरवडे फेस्टिवल सोहळ्यानिमित्त देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
अतिशय प्रतिष्ठेचा समजला जाणारा मरवडे भूषण पुरस्कार मरवड्याचे सुपुत्र अर्थतज्ञ म्हणून नावलौकिक असलेले प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी यांना प्रदान करण्यात आला.
छत्रपती शिवाजी संस्कृतीक व क्रीडा मंडळाच्या वतीने गेल्या 24 वर्षांपासून मरवडे फेस्टिवलचे आयोजन करण्यात येते या फेस्टिवलच्या निमित्ताने विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येते यावर्षीच्या फेस्टिवल मध्ये या पुरस्कारांचे मोठ्या थाटात आणि उत्साहात वितरण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे उपस्थित होते. मरवडेच्या सरपंच पूनम मासाळ या अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी व्यासपीठावर सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष ॲड. नंदकुमार पवार, उद्योगपती योगेश खटकळे, सुप्रसिद्ध भूलतज्ञ डॉ. राजेंद्र जाधव, भारत मासाळ सर, श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक सचिन शिवशरण, माजी सरपंच दादासाहेब पवार, शिवाजी पवार, राहुल मोरे, साहेबराव पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
मरवडे फेस्टिवल निमित्त स्वर्गीय मुक्ताबाई आप्पा कुंभार साहित्य गौरव पुरस्कार आशुतोष रावरीकर (मुंबई), भारत सातपुते (लातूर), प्रा. शिवाजी बागल (पंढरपूर) यांना तर स्वर्गीय भागवतराव पवार कला गौरव पुरस्कार हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध गायिका शकुंतला जाधव (मुंबई), संगीत विशारद प्रसाद पाटील (सांगोला) यांना देऊन सन्मानित करण्यात आले. स्वर्गीय ठकुबाई जाधव श्रावण बाळ पुरस्कार महेश कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला तर मरवडे भूषण पुरस्कार प्रा. डॉ. संतोष सूर्यवंशी यांना प्रदान करण्यात आला.
या सन्मान सोहळ्याचे प्रास्ताविक संयोजक सुरेश पवार यांनी केले. मान्यवरांचे स्वागत मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब सूर्यवंशी, सिद्धेश्वर रोंगे, संजय सरडे, दत्तात्रय कालिबाग, गणेश जगताप, प्रा. राजेश कुलकर्णी, सौरभ रोंगे, सर्जेराव पवार यांनी केले. सूत्रसंचालन निखिल कुलकर्णी व सचिन कुलकर्णी यांनी केले आभार दत्तात्रय मासाळ यांनी मानले.