जत : पांडुरंग कोळळी
जत तालुक्यात भाजपाला अतिशय चांगले वातावरण असताना आणि विधानसभेला ही जागा भाजप पुन्हा काबीज करू शकते अशी स्थिती असताना भाजप नेते डॉ. रवींद्र आरळी यांनी मात्र भाजपात गटबाजीला बळ देण्याचा सुरू केलेला प्रकार पक्षासाठी अडचणीचे ठरू शकतो. त्यामुळे त्यांच्याविषयी आम्ही वरीष्ठांकडे तक्रार करूच, पण डॉ. आरळींनी पक्षात सुरू केलेल्या चमकोगिरीचा उदयोग बंद करावा, असा जोरदार टोला भाजप नेते तथा पंचायत समितीचे माजी सदस्य रवींद्र सावंत व भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष अविनाश गडीकर यांनी पत्रकार बैठकीत लगावला आहे.
लोकसभेला जिल्ह्यात भाजपला लीड दिलेल्या जत मतदारसंघात पक्षातील गटबाजी आता ठळकपणे दिसू लागली आहे. विधानसभेच्या तोंडावर होत असणारी ही गटबाजी धोकादायक असून, यामुळे पक्षाचे नुकसान होवू शकते. यावर अखेर भाजपच्या नेत्यांनी थेट डॉ. रवींद्र आरळी यांच्यावर निशाना साधला आहे. नेते रवींद्र सावंत व अविनाश गडीकर म्हणाले, डॉ. रवींद्र आरळी हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याबददल आंम्हाला नेहमीच आदर राहीला आहे. परंतु अलिकडे त्यांनी पडदयामागून पक्षात जी गटबाजी सरू केली आहे, ती चुकीची आहे. यामुळे सामान्य कार्यकर्ते आणि जनतेत पक्षाविषयी चुकीचा संदेश जातो आहे.
मुळात डॉ. आरळी यांच्याकडे पक्षाने केंद्रीय सिमेंट कार्पोरेशनच्या संचालक पदाची जबाबदारी दोन वर्षापूर्वी दिली. या पदाचा कसलाही उपयोग त्यांनी तालुक्याच्या हितासाठी, पक्षासाठी केला नाही. केवळ पक्षातील ज्येष्ठ म्हणून मिरवणे, पक्षवाढीसाठी काम न करता केवळ आमदारकीची सुप्त इच्छा बाळगून अनेकांना डिवचून गटबाजी निर्माण करत स्वतःची पोळी भाजून घेण्याचा प्रकार सुरू केला आहे. अलिकडे हा प्रकार त्यांनी चांगलाच वाढवला आहे. शिवाय केंद्रीय कमीटीवर असतानाही त्यांनी अशाच गटबाजीचे कारस्थान करत ‘माझी लाडकी बहीण’ समितीचे तालुकाध्यक्ष पदही नुकतेच पदरात पाडून घेतले आहे. वास्तविक भाजपात अनेक चांगले चेहरे आणि जे लोकांमध्ये जावून काम करतात अशी माणसं असताना सगळी पदे आपणालाच हवीत, हा अटटाहास कशासाठी असा सवाल करून डॉ. आरळींनी पक्षवाढीसाठी काय योगदान दिले हे जाहीर करावे असेही सावंत व गडीकर म्हणाले.
शिवाय केवळ वरीष्ठ नेते आले की चमकोगिरी करणे, लाळघोटेपणा करणे, पक्षात नेटाने काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात वरीष्ठांच्या कानात फुंकर घालणे. असे प्रकार त्यांनी सुरु केले आहेत. याविषयी पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांच्या बैठकीत आम्ही तक्रार करणार आहोत. डॉ. आरळींनी आता आपल्या ज्येष्ठत्वाचा आणि जन माणसातला स्वःताचा आवाका ओळखून काम करावे. पक्षात तुम्हांला मान, सन्मान आहे. याबाबत आमचे दुमत असण्याचे कारण नाही, पण ज्या पक्षामुळे आपण आणि तुमची उभारलेली असेट याचा तरी विचार करावा. ज्या पक्षाने तुम्हाला न मागता अनेक पदे दिली, अनेकदा संधी दिली. त्या पक्षाला जतमध्ये चांगले वातावरण तयार झाले असताना त्यात मिठाचा खडा टाकण्याचे काम थांबवावे. असेही सावंत व गडीकर यांनी स्पष्ट केले. यावेळी अविनाश वाघमारे, नीलकंठ संती, मुत्ताप्पा काराजनगी, बसाप्पा संती उपस्थित होते.