टीम लोकमन मंगळवेढा |
बहुजनांना शिक्षणाची दारे खुली करून, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे महान कार्य रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केले. त्यांच्या 137 व्या जयंतीनिमित्त उदयसिंह मोहिते पाटील विद्यालयात कर्मवीर सप्ताह उपक्रमा अंतर्गत कर्मवीर भाऊराव पाटील यांचे जीवन व त्यांचे शैक्षणिक कार्य या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सातारा येथील रयत शिक्षण संस्थेचे विशेष अधिकारी माजी प्राचार्य शहाजी डोंगरे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. त्यांनी विद्यार्थ्यांना पदमभूषण भाऊराव पाटील यांचा जीवनपट उलगडून दाखवला.
कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म 22 सप्टेंबर 1887 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज गावात झाला. त्यांचे वडील पगोंडा पाटील हे शेतकरी होते. भाऊराव पाटील यांचे पाचवीपर्यंतचे शिक्षण विटा येथे झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरला जावे लागले. कोल्हापुरात मॅट्रिकची परीक्षा दिली पण त्यात ते नापास झाले. शिक्षणात अपयश आल्यानंतर भाऊराव पाटील यांनी आपले जीवन शिक्षणाच्या प्रसारासाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला.
1910 मध्ये त्यांनी कुंभोज येथे वसतिगृहाची स्थापना केली. या वसतिगृहातून शेतकरी व गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात होते.1920 मध्ये भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. ही संस्था महाराष्ट्रातील सर्वात मोठी शैक्षणिक संस्था आहे. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रात अनेक शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे स्थापन झाली. 1935 मध्ये महात्मा फुले अध्यापक विद्यालय सुरु केले.
भाऊराव पाटील यांनी साताऱ्यात एक वसतिगृह स्थापन केले होते. ज्यासाठी त्यांंनी पत्नीचे मंगळसूत्र व दागिनेही विकले होते. त्यांंच्या पत्नीचा सुद्धा या कामात मोठा पाठिंंबा होता. कमवा आणि शिका, स्वावलंबी शिक्षण हे आण्णांचे धोरण होते. मन, मनगट आणि मेंदू सक्षम करणारे शिक्षण असावे, हा त्यांचा आग्रह होता. त्यांंच्या कार्यासाठी अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले अशी माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.
यावेळी माजी प्राचार्य साहेबराव लेंडवे लाईफ वर्कर रयत शिक्षण संस्था सातारा, अंबादास पवार माजी मुख्याध्यापक रयत शिक्षण संस्था सातारा, प्रशालेचे प्राचार्य सुधीर पवार, मार्गदर्शक लक्ष्मण नागणे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शनाने या कार्यक्रमाची सांगता झाली.