टीम लोकमन मंगळवेढा |
सहकाराची स्थापना देशपातळीवर झाली असती तरी सर्वात जास्त सहकार महाराष्ट्रात रूजला याचा सर्व महाराष्ट्रवासीयांना अभिमान असल्याचे प्रतिपादन सोलापूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप पतंगे यांनी केले. सहकार दिनानिमित्त मंगळवेढा येथील संत कान्होपात्रा महिला नागरी सहकारी बिगरशेती पतसंस्थेच्या वतीने रविवार दिनांक 7 जुलै रोजी सहकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना दिलीप पतंगे बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेच्या संस्थापक चेअरमन सीमा दिगंबर भगरे होत्या. यावेळी पतंगे म्हणाले, सहकारात दररोज वेगवेगळे बदल घडत आहेत. शासनाला अंशदान द्यावे लागते. परंतू या गोष्टीला फेडरेशनचा विरोध आहे व राहील. दरवर्षी काही संस्थाना दोष दुरूस्ती अहवाल द्यावा लागतो. हे टाळायचे असेल तर संचालकानी आपले कर्तव्य चोखपणे बजावले पाहिजे. पतसंस्थाचे कवच म्हणून फेडरेशन काम करीत असून या फेडरेनच्या माध्यमातून पतसंस्थांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे पतंगे यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यात मोठया सहकारी पतसंस्था मंगळवेढयात आहेत. यामध्ये धनश्री महिला पतसंस्थेचा आवर्जून उल्लेख केला जातो. महिला पतसंस्थेत महिलांनी आपले अधिकार व कर्तव्ये समजून घेतली पाहिजेत. संचालकांनी प्रशिक्षणे, चर्चासत्र मेळावे आवर्जून अटेंड केली पाहिजेत. नवीन पतसंस्थेची सुरूवात चांगली झाली पाहिजे यासाठी कारभार पारदर्शक ठेवावा. नवीन पतसंस्थांनी सुरूवातीला छोटी कर्जे वाटप करावीत. मोठी कर्जे टाळावीत. सुरूवातीला वाटलेले कर्ज वसुल होत नाही याची अनेक उदाहरणे आहेत. कर्ज देताना रोजचे उत्पन्न आणि परतफेड क्षमता तपासून पहा. कर्जदार आपल्या लाभासाठी असला तरी कर्जदाराचा लोभ ओळखून कर्जवाटप केले पाहिजे. कारण थकबाकी वाढल्याने सर्वांचेच टेंशन वाढते. पतसंस्थेच्या संचालकांनी ही संस्था माझी आहे. मी या संस्थेचा चालक आहे, विश्वस्त आहे. असे समजून काम करावे. मालक आपल्या डोक्यात घुसू देवू नये. असा मोलाचा सल्लाही पतंगे यांनी यावेळी बोलताना दिला.
सदरप्रसंगी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देवून पतंगे यांनी सर्वांच्या शंकाचे निरसन केले. सुरवातीस सहकार भारतीचे माजी तालुकाध्यक्ष तात्यासाहेब चव्हाण यांनी प्रास्तविकात फेडरेशनच्या कार्याची माहिती देवून प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. सुत्रसंचालन तात्यासाहेब चव्हाण यांनी केले. तर पतसंस्थेच्या व्हाईस चेअरमन अनुराधा लवटे यांनी आभार मानले.
या कार्यक्रमास पतसंस्था फेडरेशनचे वसुली अधिकारी संतोष वाळके, श्री स्वामी समर्थ पतसंस्थेचे चेअरमन रामचंद्र कापशीकर, बळीराजा पतसंस्थेचे व्हा.चेअरमन अशोक वाकडे, संचालक श्रीधर भोसले, श्री कृपा महिला क्रेडीट सोसायटीचे ईश्वर जाधव, यशोदा महिला पतसंस्थेच्या व्यवस्थापिका वैशाली गणेशकर, धनश्री मल्टिस्टेटचे शिवाजी शिंदे, निसर्गोपचार तज्ञ संघटनेचे जिल्हाध्यक्ष बबन भोसले, कान्होपात्रा महिला पतसंस्थेच्या संचालिका सुवर्णा काशिद, महानंदा चव्हाण, मदिना इनामदार, महानंदा सावळे, रेश्मा ढगे, सल्लागार रसिका हेंबाडे, अॅड.हसीना सुतार यांचेसह दिगंबर भगरे, लक्ष्मण नागणे, नामदेव काशिद, दावल इनामदार, संतनाथ ढावरे, प्रमोद बिनवडे, सचिन डोरले, नवनाथ सावळे, लहू ढगे, लक्ष्मण हेंबाडे, समाधान फुगारे, बालाजी टुले आदि उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पतसंस्थेच्या प्र.व्यवस्थापिका करिश्मा मुलाणी, लिपिक साक्षी रणदिवे, वसुली अधिकारी सुहास भगरे आदिंनी परिश्रम घेतले.