टीम लोकमन मंगळवेढा |
उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशाला ही मंगळवेढ्यातील एक नामांकित व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणारी नावारूपास आलेली संस्था असून प्रशालेमध्ये 25 व 26 ऑक्टोबर या दोन दिवशी खास शिक्षकांसाठी फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅमचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमांतर्गत पहिल्या दिवशी पाहुणे म्हणून फॅबटेक पब्लिक स्कूल सांगोल्याचे प्राचार्य सिकंदर पाटील यांना आमंत्रित केले होते. व दुसऱ्या दिवशी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष सुरेश पवार यांना आमंत्रित केले होते. दोन्ही दिवशी अतिथींचा प्रशालेतर्फे प्राचार्य सुधीर पवार यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
फॅमिली पब्लिक स्कूलचे प्राचार्य सिकंदर पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्रात कार्य करत असताना पाळावयाचे नियम व तत्वे त्याचप्रमाणे शिक्षक म्हणून पालक व विद्यार्थी यांच्याशी कसा संवाद साधावा व शाळेतील शिक्षकाची भूमिका ही कशा प्रकारची असावी याविषयी मार्गदर्शन केले.
शिक्षक समिती जिल्हाध्यक्ष सुरेश पवार यांनी आनंददायी शिक्षण हे विद्यार्थ्यांसाठी किती महत्त्वाचे आहे व त्यातील शिक्षकाची भूमिका स्पष्ट केली. पूर्वीच्या गुरु-शिष्य परंपरेतील विविध घटनांना त्यांनी उजाळा दिला. शिक्षण प्रक्रियेतील पूर्वी असलेली शिक्षक -पालक यांची भूमिका व आत्ताची शिक्षक- पालक यांची भूमिका यात होत असलेला बदल त्यांनी स्पष्ट केला. विविध उदाहरणांद्वारे शिक्षक हा समाजातील एक असामान्य घटक आहे व त्याचे स्थान खूप महत्त्वपूर्ण आहे हे समजावून सांगितले.
या कार्यक्रमामुळे प्रशालेतील सर्व शिक्षकांना मार्गदर्शन मिळाले.मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या चेअरमन डॉ. पुष्पांजली शिंदे, राजपत्रित वैद्यकीय अधिकारी पतसंस्थेचे चेअरमन डॉ. नंदकुमार शिंदे यांनीदेखील या कार्यक्रमांचे विशेष कौतुक केले. प्रशालेचे प्राचार्य सुधीर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हा कार्यक्रम शिस्तबद्ध वातावरणात व उत्साहात पार पाडला.