टीम लोकमन सांगोला |
तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन गावाकडे परत जाताना भाविकांचा भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने मालट्रकला पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोघे जागीच ठार तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज सोमवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी नागपूर महामार्गावरील सांगोला शहरानजीक चिंचोली बायपास येथे घडला. अपघातातील मृत व जखमी कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
सुखदेव बामणे वय 40 व नैनेश कोरे वय 31 दोघेही रा. नांदणी ता. शिरोळ जि. कोल्हापूर अशी मृतांची नावे आहेत तर अनिल शिवानंद कोरे वय 42 राहणार नांदणी, सुधीर चौगुले वय 35 राहणार वडगाव, सुरज विभुते 21 राहणार कोथळी हे तिघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सांगोला येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातानंतर महामार्ग पोलीस पथक, सांगोला पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने अपघात स्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त कार रोडवरुन बाजूला काढून जखमींना उपचारासाठी तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल केले.
कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी व वडगाव येथील पाच मित्र मिळून रविवारी MH 09 FB 3908 या वॅगनार कारमधून तुळजापूर येथे नवरात्रीनिमित्त तुळजाभवानीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शनानंतर नागपूर रत्नागिरी महामार्गावरुन नांदणी जि. कोल्हापूर इथे गावाकडे निघाले होते. परंतु रस्त्यात सांगोला शहरानजीक चिंचोली बायपासवर त्यांच्या भरधाव कारची डाळिंब घेऊन जाणाऱ्या 16 चाकी MP 20 ZM 9518 या मालट्रकला पाठीमागून जोराची धडक बसल्याने हा भीषण अपघात झाला.