टीम लोकमन मंगळवेढा |
मंगळवेढा तालुक्यामध्ये पुनर्रचित हवामानावर आधारित खरीप 2023 वर्षासाठीचे खरीप हंगामातील पिकाचे पिकविमे 51 हजार 272 हेक्टर क्षेत्रावर भरले होते. त्यातील 47 हजार 80 शेतकऱ्यांना सुमारे 13 कोटी रुपये पिक विमा मंजूर झाला असून लवकरच त्यांच्या खात्यावर पिक विम्याची रक्कम वर्ग होणार असल्याची माहिती पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे.
यामध्ये मध्य प्रतिकूल परिस्थितीत बाजरी पिकासाठी 11 हजार 58 शेतकऱ्यांनी विमा भरला होता. त्यातील 10 हजार 106 शेतकऱ्यांना 2 कोटी 59 लाख रुपयांचा पिकविमा खात्यावर जमा झाला असून उर्वरित शेतकऱ्यांचे खाते नंबर आधार कार्डशी संलग्न नसल्यामुळे त्यांना केवायसी केल्यानंतरच हे पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत.
त्याचबरोबर वैयक्तिक कंपनी तक्रार केल्यानंतर पंचनामे होऊन नैसर्गिक आपत्ती मधून कांदा, तूर, मका, बाजरी या पिकांसाठी 2 हजार 531 शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे तक्रार केली होती. त्या तक्रारदार शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी 2 कोटी 86 लाख रुपये मंजूर झाले असून तेही लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत.
सीसीइ आधारित 33 हजार 491 शेतकऱ्यांचाही पिक विमा मंजूर झाला असून सात कोटी 31 लाख 70 हजार रुपये मंजूर असून तेही लवकरच खात्यावर जमा होणार आहेत. त्याचबरोबर फळपिक विमा योजनेच्या बाबतीतही पाठपुरावा सुरू आहे. तरी यावर्षीही सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा उतरवणे आवश्यक आहे. शासनाने एक रुपयात विमा सुरू केला असून सर्व शेतकऱ्यांनी या विमा योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहनही आमदार समाधान आवताडे यांनी केले आहे.