टीम लोकमन मंगळवेढा |
शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांच्या छत्रछायेत वाढलेले आणि शरद पवारांची साथ सोडल्यानंतर अखेरच्या श्वासापर्यंत भाजप सोडणार नाही अशी भीष्मप्रतिज्ञा करणाऱ्या आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते असलेल्या प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांना भारतीय जनता पार्टीच्या पोस्टरवरून बेदखल करण्यात आल्याने संपूर्ण जिल्ह्यात याची मोठी चर्चा होत आहे.
वीस वर्षे आमदार, जवळपास पंधरा वर्षे विविध मंत्री पदावर कार्यरत, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मागासवर्गीय सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग महामंडळाचे अध्यक्ष अशी अनेक सन्मानाची पदे भूषवलेले व काही वर्षांपूर्वी संपूर्ण राज्यात दबदबा असलेले, आपल्या ओघवत्या वाणीच्या जोरावर प्राध्यापक ते कॅबिनेट मंत्री असा प्रवास करणारे प्रा. लक्ष्मणराव ढोबळे राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज होऊन भारतीय जनता पार्टीत डेरेदाखल झाले. देशात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपमध्ये सरांनी प्रवेश केल्यानंतर कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढल्या. सरांना राज्यसभा, विधानपरिषद, मंत्रीपद मिळेल अशा भोळ्या अपेक्षा ठेवून कार्यकर्ते भाजपचा झेंडा घेऊन नाचत होते. पण कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास झाला. मंत्रीपद जाऊ दे पण जिल्ह्याच्या भाजपच्या पोस्टरवर सुद्धा ढोबळे सरांना स्थान मिळत नाही. त्यामुळे सरांचे कार्यकर्ते कमालीचे नाराज झाले आहेत.
भारतीय जनता पार्टीच्या मदतीने दिल्लीला जाण्याच्या तयारीत असलेल्या ढोबळे सरांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी नाकारली आणि फडणवीसंच्या निकटवर्तीय असलेल्या आमदार राम सातपुते यांना उमेदवारी मिळाली. तरीसुद्धा ढोबळे सरांनी मोठ्या मनाने भारतीय जनता पार्टीचा प्रचार जीव तोडून सुरू केला. सरांचा शाहू परिवार मोठा परिवार आहे. काही दिवसांपूर्वीच शाहू परिवाराने देखील राम सातपुते यांना पाठिंबा जाहीर केला आहे. भाजपमध्ये गेल्यापासून ढोबळे सरांना सापत्न वागणूक मिळत असल्याची कार्यकर्त्यांची ओरड होती. सरांना काही महिन्यापूर्वीच भारतीय जनता पार्टीने प्रदेश प्रवक्ते पद देऊन भाजपची भूमिका माध्यम आणि जनतेसमोर मांडण्याची मोकळीक दिली. परंतु सोलापूर भाजपला पंधरा वर्षे मंत्री, वीस वर्षे आमदार आणि प्रदेश प्रवक्ते असलेल्या ढोबळे सरांचे विस्मरण झाले.
आज भारतीय जनता पार्टीचे माढा आणि सोलापूर मतदार संघातील उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि राम सातपुते यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे सर्वेसर्वा असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. आजच्या कार्यक्रमासाठी तयार करण्यात आलेल्या पोस्टरवर जिल्ह्यातील बहुतांश नेत्यांचे, आमदारांचे, माजी आमदार यांचे फोटो दिसले परंतु ढोबळे सरांचा फोटो मात्र या पोस्टरवरून गायब झाल्याचे ठळकपणे जाणवत होते. सरांना भाजपमध्ये सातत्याने आवडले जात असल्याने सरांचा जिवाभावाचा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती जमाती मोर्चाचा जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश खंदारे यांनी तर याबाबत थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडेच तक्रार केली आहे. प्रकाश खंदारे फक्त तक्रार करूनच थांबले नाहीत तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाध्यक्षांकडे सोपवला आहे.
मंगळवेढ्यात ढोबळेंना माणणारा मोठा वर्ग आहे. भाजप ढोबळेंना डावलत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. ही नाराजी भारतीय जनता पार्टीला अडचणीची ठरू शकते. भारतीय जनता पार्टीने आपली चूक वेळेतच सुधारून ढोबळेना सन्मानाने वागवले नाही तर याचा परिणाम भारतीय जनता पार्टीच्या लोकसभेच्या उमेदवारांवर होऊ शकतो. ढोबळे सर जरी नाराजी उघडपणे व्यक्त करीत नसले तरी शांत राहून करेक्ट कार्यक्रम करण्यात ढोबळे माहीर आहेत हे संपूर्ण राज्याला माहित आहे. त्यांचं उपद्रव मूल्य सर्वांना माहीत आहे. त्यामुळे ढोबळे आणि कार्यकर्त्यांची नाराजी भाजपला परवडणारी नाही. देवेंद्र फडणवीस यांनी याची दखल घ्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांमधून पुढे येताना दिसत आहे. कार्यकर्त्यांची नाराजी दूर झाली नाही तर याचे परिणाम येत्या काळात दिसू लागतील.