टीम लोकमन मंगळवेढा |
ज्येष्ठ नेते शरद पवारांची साथ सोडून देवेंद्र फडणवीसांच्या गोटात सामील झालेले राज्याचे माजी उच्च शिक्षणमंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे हे जरी फडणवीसांच्या सोबत दिसत असले तरी त्यांच्या दोन्ही मुलांनी थेट शरद पवारांच्या तुतारीकडे उमेदवारीसाठी मुलाखत दिल्याने ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
प्रा. लक्ष्मणराव ढोबळे हे शरद पवारांना दैवत मानत होते. पवारांच्या बोटाला धरूनच त्यांनी राजकीय धडे गिरवले. एकेकाळी ते शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून ओळखले जात होते. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात त्यांनी प्रदीर्घ काळ विविध खात्यांचा पदभार सांभाळला आहे. राज्यात सत्तांतर झाल्यावर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व मान्य करत भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर भाजपने त्यांना साजेसा न्याय तर दिला नाहीच मात्र पक्षाचे प्रवक्ते म्हणून त्यांची नियुक्ती सुद्धा बऱ्याच प्रतीक्षेनंतर झाली. त्यामुळे हा उच्च विद्याविभूषित व जिभेवर सरस्वती असणारा फायर ब्रँड नेता अडगळीत पडला होता.
ढोबळे सरांचा वापर भाजपने केवळ शरद पवार आणि त्यांच्या पक्षावर टीका करण्यासाठीच करुन घेतला. म्हणूनच त्यांना पक्षाचे प्रवक्ते पद देण्यात आले होते. सध्यातरी ढोबळे सर भाजपचे काम मोठ्या निष्ठेने करत असले तरी त्यांची कन्या कोमल आणि मुलगा अभिजीत यांनी भाजप आणि फडणवीस यांना सोडून शरद पवारांना साथ देणे पसंत केल्याचे दिसत आहे. काल पुणे येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मुलाखतीत सहभाग नोंदवून तुतारी हाती घेणार असल्याचे संकेतच दिले आहेत.
ढोबळे सरांच्या दोन्ही मुलांनी शरद पवारांच्या पक्षात मुलाखत देऊन आपली राजकीय भूमिका काय असणार याची झलक दिली आहे. मात्र आपल्या ओघवत्या वाणीने अवघ्या महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करणाऱ्या ढोबळे सरांची भूमिका काय असेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. पण ढोबळे मास्तरांनी राष्ट्रवादी पुन्हा म्हटले तर भाजपला विधानसभेचा पेपर अवघड जाणार हे मात्र निश्चित आहे.
जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग
प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांची कन्या कोमल ढोबळे-साळुंखे व सूतगिरणीचे अध्यक्ष असलेले त्यांचे सुपुत्र अभिजीत ढोबळे यांनी राखीव असलेल्या माळशिरस व मोहोळ या दोन्ही विधानसभा मतदार संघासाठी मुलाखती दिल्या आहेत. सध्या मोहोळमध्ये अजित पवार गटाचे यशवंत माने हे आमदार असून त्यांच्या विरोधात भाजपमधून शरद पवार गटात गेलेले संजय क्षिरसागर हे प्रमुख चर्चेतले उमेदवार आहेत. याशिवाय मोहोळचे माजी आमदार रमेश कदम, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे राजू खरे यांनीही मोहोळ विधानसभा मतदार संघासाठी मुलाखती दिल्या आहेत. मात्र ढोबळे सरांच्या दोन्ही मुलांनी दिलेल्या मुलाखतीमुळे जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
कोमल ढोबळे यांनी मुलाखत दिल्याने चर्चांना जोर
ढोबळे सरांच्या कन्या कोमल ढोबळे या गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पार्टीवर नाराज होत्या. त्या भाजपला रामराम करणार असल्याच्या चर्चाही मोठ्या प्रमाणात सुरू होत्या. सुरुवातीला त्यांच्या बीआरएस प्रवेशाचे वातावरण निर्माण झाले असतानाच कोमल ढोबळे यांनी थेट तुतारीकडे उमेदवारी मागत मुलाखत दिल्याने राजकीय चर्चेला जोर आला आहे. कोमल यांचे लहान बंधू अभिजीत यांनीही मोहोळ व माळशिरस या दोन मतदारसंघासाठी मुलाखत दिली आहे.
सोलापूर जिल्ह्यातून सर्वात जास्त उमेदवारीची मागणी ही शरद पवार यांच्या तुतारीकडे होऊ लागल्याने पवारांची जादू वाढत चालल्याचे दिसत आहे. शरद पवारांचा करिष्मा आजही कायम असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी त्यांची दोन्ही मुले तुतरीच हाती घेणार हे स्पष्ट दिसत आहे.