रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटी व मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांचेवतीने शनिवार दिनांक 23 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10 ते 2 यावेळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटी चे सेक्रेटरी अभिजीत बने यांनी दिली.
मंगळवेढा मरवडे रोडवरील मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे होणाऱ्या या शिबिराचे उद्घाटन श्री संत दामाजी मेडिकल फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. पुष्पांजली शिंदे यांच्या शुभहस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचे प्रेसिडेंट अमोल रत्नपारखी भूषविणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. अरुणकुमार महिंद्रकर, सोनोग्राफी व क्षकिरण तज्ञ डॉ. दत्तात्रय घोडके, बालरोग तज्ञ डॉ. महेश कोनळ्ळी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नंदकुमार शिंदे, नेत्ररोग तज्ञ डॉ. निनाद नागणे, दंतरोग तज्ञ डॉ. सचिन बनसोडे उपस्थित राहणार आहेत. सुप्रसिद्ध नागपूर एम्स मधील कामाचा प्रदीर्घ अनुभव असलेले कन्सल्टींग फिजिशियन डॉ.मनीष बसंतवाणी हे रुग्णांची मोफत तपासणी करणार आहेत. या शिबिरामध्ये डेंग्यू ,मलेरिया, चिकनगुनिया, टीबी, शरीरातील रक्त कमी असणे, वारंवार थकवा येणे, डोकेदुखी, अतिथकवा, चिडचिड होणे, चालताना दम लागणे व घाम येणे, ह्रदयरोग, चक्कर येणे, किडनीविकार, मेंदूविकार, लकवा (पॅरालिसिस), टायफाईड, छातीत दुखणे, धडधडणे, वजन कमी होणे, मधुमेह, उच्च रक्तदाब, भूक न लागणे, थायरॉईड, हातापायांना सूज येणे, झटके, कावीळ, लिव्हर, पित्ताशयाचे आजार, रक्तपेशींचे आजार आदी आजारांच्या रुग्णांची मोफत तपासणी करून मार्गदर्शन केले जाणार आहे. या शिबिरामध्ये आलेल्या रुग्णांची आवश्यकता असल्यास ईसीजी, रँडम ब्लड शुगर, ब्लड प्रेशर इत्यादी तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत.
तरी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा गरजू रुग्णांना लाभ घ्यावा असे आवाहन प्रोजेक्ट चेअरमन डॉ. समाधान टकले यांनी केले आहे.
हे शिबीर यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचे सर्व सदस्य, मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मधील डॉक्टर्स, स्टाफ व संत कान्होपात्रा नर्सिंग कॉलेज मधील स्टुडंट्स प्रयत्न करीत आहेत.