टीम लोकमन मंगळवेढा |
रणजितसिंह मोहिते पाटील यांनी विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा, असा ठराव माळशिरस तालुका महायुतीच्या वतीने करण्यात आला आहे. तसेच मोहिते पाटील यांच्या संस्थांची चौकशी करावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे. आज माळशिरस विधानसभा मतदारसंघ महायुतीची आढावा बैठक माळशिरस येथे संपन्न झाली. यावेळी भाजपा माळशिरस विधानसभा निवडणुक प्रमुख व भाजपा राज्य कार्यकारणी सदस्य के. के. पाटील यांनी त्यांच्या राजीनाम्याचा ठराव मांडला. यावेळी माळशिरसचे आमदार राम सातपुते देखील उपस्थित होते.
माळशिरस तालुका महायुतीच्या वतीने ठराव करण्यात आला आहे. रणजितसिंह मोहिते पाटील यांचा राजीनामा घ्यावा. तसेच मोहिते पाटील यांच्या संस्थेची चौकशी करावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे. मोहीते पाटील यांनी विविध संस्थेच्या माध्यमातून माळशिरस तालुक्यातील आणि सोलापूर जिल्ह्यातील लोकांची आर्थिक फसवणूक केली आहे. या संस्थांची उच्चस्तरीय समितीकडुन चौकशी करण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली आहे. यावेळी माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार राम सातपुते व महायुती मध्ये समाविष्ट असणाऱ्या पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
कोण आहेत रणजितसिंह मोहित पाटील?
रणजितसिंह मोहिते पाटील हे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र आहेत. ते सध्या भारतीय जनता पार्टीचे विधानपरिषदेचे आमदार आहेत. एक अभ्यासू, तरुण तडफदार नेतृत्व म्हणून रणजितसिंह मोहिते पाटील यांची ओळख आहे. मोहिते पाटील हे शरद पवारांचे कट्टर समर्थक होते. मात्र, 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी रणजितसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर रणजीतसिंह मोहिते पाटील यांना विधानपरिषदेरवर पाठवण्यात आले होते. दरम्यान, यावेळी माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत मोहिते पाटील यांनी निंबाळकरांना 1 लाख मताहून अधिक लीड माळशिरस मतदारसंघातून दिले होते. निंबाळकरांच्या विजयात मोहिते पाटलांचा मोठा वाटा होता.
लोकसभा निवडणुकीच्या काळातच धैर्यशील मोहिते पाटलांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
2024 च्या लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील यांच्या कुटुंबातील धैर्यशील मोहिते पाटील हे भाजपकडून लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. त्यांनी भाजपकडे तशी इच्छा देखील व्यक्त केली होती. मात्र भाजपने धैर्यशील मोहिते पाटील यांना डावलत पुन्हा रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी दिली. मात्र या निवडणुकीत भाजपला पराभवचा मोठा धक्का बसला. कारण शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदावरी देण्यात आली होती. मोहिते पाटलांनी निंबाळकरांचा पराभव केला. मात्र या निवडणुकीत रणजितसिंह मोहिते पाटील हे कुठेही धैर्यशील मोहिते पाटील यांचा प्रचार करताना दिसले नाहीत. तरीदेखील त्यांच्यावर कारवाई करुन, त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी माळशिरस महायुतीच्या वतीने करण्यात आली आहे. आता यावर भाजपचे श्रेष्ठी काय निर्णय घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. मात्र या ठरावामुळे जिल्ह्याचा राजकारणात मोठी खळबळ माजली आहे.