टीम लोकमन पंढरपूर |
मी पहिल्यांदा करतो आणि नंतर बोलतो असा माझा स्वभाव आहे. पंढरपूर आणि मंगळवेढा या दोन्ही तालुक्यातील बऱ्यापैकी प्रश्नांना मी न्याय देण्याचा आजपर्यंत प्रयत्न केला आहे. या दोन तालुक्यांसाठी अविरतपणे काम करण्याचे मी स्वप्न पाहिले आहे. माता भगिनींचा आशीर्वाद हा सगळ्यात मोठा असतो आणि तो ज्याला मिळतो त्याला एक वेगळी ऊर्जा मिळते. म्हणूनच पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी मी जे स्वप्न पाहिले आहे ते पूर्ण करण्यासाठी मला तुमचा आशीर्वाद द्या. असे आवाहन भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत यांनी केले. ते पंढरपूर येथील दाते मंगल कार्यालयात आयोजित होम मिनिस्टर या कार्यक्रमात बोलत होते.
अनिल सावंत यांनी पंढरपूर येथील दाते मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाला महिलांनी प्रचंड गर्दी केल्याचे पहायला मिळाले. सध्या अनिल सावंत हे मतदारसंघात वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधत आहेत. गावभेट दौरा, वेगवेगळ्या जयंती कार्यक्रम, तसेच नुकत्याच झालेल्या गणेशोत्सात पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील प्रत्येक गावात विविध मंडळांना भेटी देत युवकांशी संपर्क साधला.
भैरवनाथ शुगरच्या माध्यमातून याआधी ते सामाजिक कार्यात अग्रेसर असल्यामुळे दोन्ही तालुक्यांमध्ये त्यांचा जनसंपर्क आहे. पण आतापर्यंत माता भगिनींच्या संपर्कात येण्याची संधी त्यांना मिळाली नव्हती. परंतु होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या माध्यमातून ते महिला मतदारांमध्ये आपली क्रेझ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
पंढरपूर आणि मंगळवेढा या दोन्ही तालुक्यात होम मिनिस्टरचे एकूण चार कार्यक्रम अनिल सावंत मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आले आहेत. पंढरपूर येथील दाते मंगल कार्यालयात संपन्न झालेल्या होम मिनिस्टर कार्यक्रमात सिनेअभिनेत्री पुजा काळभोर हिने महिलांमध्ये जोश निर्माण केला. असंख्य महिला या कार्यक्रमात मंत्रमुग्ध होऊन सहभागी झाल्या होत्या.
पंढरपूर येथील पूजा शिंदे यांना रॅम्पवॉक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला. पहिले बक्षीस म्हणून त्यांना एलईडी टीव्ही भेट देण्यात आला. पंढरपूर येथीलच अमृता शिंदे दोरी उडी या स्पर्धेत जिंकल्याने त्यांना शिलाई मशीन देण्यात आली. पंढरपूरच्या रेश्मा साळुंखे तळ्यात मळ्यात या स्पर्धेमध्ये जिंकल्याने त्यांना बक्षीस म्हणून वॉशिंग मशीन देण्यात आले. मंगळवेढा येथील सपना साळुंखे यांचा तळ्यात मळ्यात या खेळात चौथा क्रमांक आल्याने त्यांना बक्षीस म्हणून पिठाची चक्की देण्यात आली. पाचवा क्रमांक निकिता साठे बोहाळी, कच्चा पापड पक्का पापड, बक्षीस फ्रीज देण्यात आले. या सर्व विजेत्यांना अनिल सावंत यांच्या पत्नी शैलजा सावंत यांचे शुभहस्ते बक्षीसे वितरित करण्यात आली.
मंगल कार्यालय पुन्हा ओव्हरफ्लो
पंढरपूर येथील दाते मंगल कार्यालयात अनिल सावंत यांचेवतीने होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम सुरू होण्याआधीच मंगल कार्यालय ओव्हरफ्लो झाले. यानंतर मंगल कार्यालयाच्या परिसरातील जागेत महिलांसाठी बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली. या कार्यक्रमाला महिलांनी प्रचंड गर्दी केली होती. याआधी मंगळवेढा येथील मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या होम मिनिस्टर या कार्यक्रमादरम्यान ते मंगल कार्यालय कार्यक्रम सुरु होण्यापूर्वीच ओव्हरफ्लो झाले होते. त्यामुळे कार्यक्रम सुरु होण्याआधीच दोन्ही ठिकाणची मंगल कार्यालये ओव्हरफ्लो झाल्याची चर्चा उपस्थित महिलांमध्ये रंगली होती.