टीम लोकमन मंगळवेढा |
महाराष्ट्रात महिला आणि मुलींच्या सुरक्षेवर कितीवेळा प्रश्न उपस्थित करायचा? असादेखील प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. महाराष्ट्रात महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न वारंवार ऐरणीवर येत आहे. विशेष म्हणजे शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना आज समोर आली आहे.
याआधीदेखील अशा घटना समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी बदलापुरातील शाळेत घडलेल्या घटनेने राज्य हादरले होते. या घटनेने शिक्षण क्षेत्राची लक्तरे वेशीवर टांगली गेली होती. तसेच नाशिकमध्ये एका निवृत्त मुख्याध्यापकाकडून सरकारी कार्यालयात महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला गेल्याची घटना देखील समोर आली होती. यानंतर आता चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात असाच संतापजनक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे वरारो शहर हादरले आहे. या घनेच्या निषेधार्थ उद्या वरोरा शहर बंदची हाक देण्यात आली आहे.
नेमके प्रकरण काय आहे?
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील नामांकित कनिष्ठ महाविद्यालयात 2 शिक्षकांनी 17 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित विद्यार्थिनी इयत्ता अकरावीत शिक्षण घेत आहे. प्रमोद बेलेकर आणि धनंजय पारखे अशी आरोपी शिक्षकांची नावे आहेत. आपल्या वाढदिवसाचे निमित्त करून या विद्यार्थिनीला शिक्षकांनी आपल्या रूमवर बोलावले होते. वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून या आरोपी शिक्षकांनी तिच्याकडे मिठीची मागणी केली. तिने घाबरून पळ काढण्याचा प्रयत्न करताच बळजबरी करण्यात आली.
भीतीने पळून आलेल्या पीडित मुलीने पालकांना याची माहिती दिली. यानंतर पीडितेच्या पालकांनी वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. वरोरा पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून पोलिसांनी आरोपी शिक्षकांच्या विरोधात पॉक्सो आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. आपल्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच आरोपी दोन्ही शिक्षक फरार झाले आहेत.
वरोरा शहरातील विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्ष या घटनेनंतर आक्रमक झाले आहेत. त्यांनी शिक्षकांच्या निलंबनाची मागणी केली आहे. मनसे, भाजप, बजरंग दल या पक्ष आणि संघटनांनी या घटनेविरोधात आंदोलन करून आरोपी शिक्षकांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. याच प्रकरणावरुन 31 ऑगस्टला वरोरा बंदची हाकही देण्यात आली आहे.