टीम लोकमन पुणे |
सध्या राजधानी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या भागात तर पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक नद्या दुथडी भरुन वाहत आहेत.
तर दुसरीकडे मुंबई, पुण्याला वर्षभर पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रातही चांगला पाऊस होताना दिसत आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईसह पुण्यातील अनेक धरणात 50 टक्क्यांपेक्षाही अधिक पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबई शहरासह उपनगराला सात धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मुंबईत पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मुंबईतील सात धरणात निम्म्याहून अधिक म्हणजे जवळपास 53.12 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. सोमवारी 22 जुलैला पडलेल्या पावसामुळे एकाच दिवसात 21 दिवस पुरेल इतका पाणीसाठा जमा झाला आहे.
तानसा धरण झाले ओव्हरफ्लो
मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. त्यासोबतच तुळशी तलावही काठोकाठ भरला आहे. तसेच सर्वात मोठे भातसा धरण 52 टक्के भरल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. त्यासोबतच मुंबईतील सातही जलाशयांमध्ये निम्म्याहून अधिक (53.12 टक्के) पाणीसाठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा मुंबई, ठाणे, भिवंडी, निजामपूर आणि मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पुढील 192 दिवस म्हणजेच 2 मार्च 2025 पर्यंत पुरेल इतका झाला आहे.
काय आहे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाची सद्यस्थिती
1) अप्पर वैतरणा- 18.43 %
2) मोडक सागर- 75.46 %
3) तानसा- 100 %
4) मध्य वैतरणा- 47.03 %
5) भातसा- 52.07 %
6) विहार- 88.40 %
7) तुळशी – 100 %
मुंबईतील पाणीकपात रद्द होण्याची शक्यता
सध्या राजधानी मुंबईत सुरु असलेला मुसळधार पाऊस आणि धरण क्षेत्रात सातत्याने वाढणारा पाणीसाठा यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात मुंबईतील 10 टक्के पाणीकपात रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईतील पाणीकपात रद्द करण्याबाबत आयुक्तांकडे जल विभागाची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत मुंबईतील पाणीकपात रद्द करण्याबद्दलचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुंबईसह पुण्यातही मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. पुणे जिल्हा आणि धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पुण्यातील खडकवासला हे धरण 100 टक्के भरले आहे. तर पानशेत, वरसगाव, टेमघर ही धरणे 70 टक्के भरली आहेत. सध्या खडकवासला धरणातून 35 हजार क्युसेक्स वेगाने पाण्याचा प्रवाह सुरु आहे. तर इतर चार धरणात जवळपास 20.27 टीएमसी पाणीसाठा आहे.
काय आहे पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाची सद्यस्थिती
1) खडकवासला – 100 टक्के
2) टेमघर – 57 टक्के
3) वरसगाव – 63 टक्के
4) पानशेत – 76 टक्के
पुण्यासह पिंपरी चिंचवड शहर आणि मावळ तालुक्याची तहान भागवणाऱ्या पवना धरण परिसरात रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला आहे. पिंपरीत गेल्या 12 तासांत तब्बल 374 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. यामुळे पिंपरी-चिंचवडमधील धरणाच्या पाणीसाठ्यात 12 तासांमध्ये तब्बल 10 टक्के वाढ झाली आहे.