मंगळवेढा : अभिजीत बने
राज्यात सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाला रामराम करुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात डेरेदाखल झालेले राज्याचे माजी उच्चशिक्षण मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांच्यावर राष्ट्रवादीने मोठी जबाबदारी सोपवली असून पक्षाने ढोबळेंचा योग्य सन्मान केला आहे. ढोबळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ढोबळे सरांच्या निवडीने सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीत चैतन्य निर्माण झाले आहे.
माजी केंद्रीय कृषिमंत्री व ज्येष्ठ नेते शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून अवघ्या देशाला परिचित असणाऱ्या ढोबळे सरांनी काही वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. मात्र भाजपमध्ये गेल्यावर त्यांचा योग्य सन्मान झाला नाहीच. त्यांची अवहेलनाच झाली. पक्षात ते अडगळीत पडले होते. भाजपच्या निर्णय प्रक्रियेपासून ढोबळेंना नेहमी दूरच ठेवण्यात आले. भाजपने त्यांच्यावर प्रवक्तेपदाची जबाबदारी दिली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांना जो मान सन्मान मिळत होता तो भाजपमध्ये मिळाला नाही. ते भाजपचे प्रदेश प्रवक्ते असूनही अगदी तालुका पातळीवर देखील त्यांना मानाचे स्थान कधीच मिळाले नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडताना ढोबळे सरांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यांच्यामुळेच मी पक्ष सोडत असल्याचेही ते म्हणाले होते. विशेष म्हणजे भाजप सोडतानाही त्यांनी पुन्हा अजित पवारांनाच टार्गेट केले आहे. भारतीय जनता पक्षात त्यांना सर्वसामान्य कार्यकर्त्यां प्रमाणेच वागणूक मिळत होती. असा आरोप त्यांची कन्या बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष कोमल ढोबळे यांनी केला होता.
मोहोळ विधानसभा मतदारसंघातून लक्ष्मणराव ढोबळे यांचे चिरंजीव अभिजीत ढोबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली हेाती. त्यासाठी त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची दोन वेळा भेट देखील घेतली होती. मात्र मोहोळ मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राजू खरे यांना उमेदवारी दिली आहे.
राज्याचे माजी मंत्री असलेल्या व एकेकाळी मोहोळ मतदार संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या लक्ष्मणराव ढोबळे यांनाही मोहोळ मतदारसंघातून उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा होती. मात्र पक्षाने त्यांना उमेदवारी न देता त्यांना पक्ष संघटनेत मोठी जबाबदारी देत पक्षाचे काम जोमाने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचेहस्ते ढोबळे सरांना नुकतेच नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. ढोबळे यांच्या रुपाने दलित चेहऱ्याला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने मोठी संधी दिल्याचे बोलले जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांचेवर प्रदेश उपाध्यक्षपदाच्या माध्यमातून मोठी जबाबदारी सोपवली आहे.
पक्षात प्रवेश करताच शरद पवार गटाने ढोबळे यांना मानाचे पान दिले आहे. आता ढोबळे मास्तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे फायरब्रँड नेते झाले आहेत. राज्यात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत ‘शब्दप्रभू’ म्हणून अवघ्या महाराष्ट्राला परिचित असणाऱ्या ढोबळे सरांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राज्यातील उमेदवारांच्या सभा गाजवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ढोबळे सरांच्या सभांना राज्यभरातून मागणी वाढली आहे. आपल्या दमदार भाषणांनी ढोबळे सरांनी सोलापूर जिल्हा हादरुन सोडला आहे.