टीम लोकमन मंगळवेढा |
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट येणार आहे. कारण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडून धक्क्यावर धक्के बसणार असल्याचे संकेत मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात इनकमिंगला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे. राज्यातील भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून बडे नेते मोठ्या प्रमाणात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत येत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार हे भाजप आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बड्या नेत्यांचा आपल्या पक्षात प्रवेश करुन घेत आहेत. शरद पवार यांनी आतापर्यंत अनेक मतदारसंघांमध्ये भाजप आणि अजित पवार गटाला अक्षरशः खिंडार पाडले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागलचे वजनदार भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समरजित घाटगे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. तसेच अनेक वर्षांपासून राज्याच्या राजकारणातील महत्त्वाचा चेहरा असलेले व राज्याच्या मंत्रिमंडळात प्रदीर्घकाळ विविध महत्त्वाच्या खात्यांचा पदभार सांभाळलेले इंदापूर मधील भाजपचे बडे नेते हर्षवर्धन पाटील यांनी नुकताच शरद पवार गटात प्रवेश करून तुतारी हाती घेतली आहे. यानंतर अजित पवार गटातील आणखी दोन बडे नेते शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.
विशेष म्हणजे सलग दोन दिवस दोन मोठ्या नेत्यांचे शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश होणार असल्याची माहिती मिळत आहे. शरद पवार 14 तारखेला फलटण दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यावेळी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते व राज्याच्या राजकारणात दीर्घ काळापासून सक्रिय असलेले विविध मंत्रीपदावर काम केलेले विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. तर येत्या 15 तारखेला शरद पवार हे दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यावेळी पुणे जिल्ह्याच्या राजकारणातील बडे प्रस्थ म्हणून ओळखले जाणारे दौंड येथील रमेश थोरात शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
रामराजे निंबाळकर उपमुख्यमंत्री अजितदादांची साथ का सोडत आहेत?
विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर हे अजित पवार गटात गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीवेळी माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण त्यांच्या उमेदवारीला रामराजे निंबाळकर यांनी कडून विरोध केला होता. माढा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळावा अशी रामराजेंची मागणी होती. परंतु ते शक्य झाले नाही. रामराजेंचा प्रचंड विरोध असतानाही तो विरोध डावलून महायुतीकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच माढा लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. यानंतर रामराजेंची नाराजी वाढतच गेली.
विशेष म्हणजे त्यावेळी भाजपमध्ये असणारे अकलूजचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढा लोकसभेचे तत्कालीन खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्याविरोधात मोर्चा उघडला होता. त्यावेळच्या बैठकांमध्ये रामराजेदेखील असायचे. यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश करत उमेदवारी मिळवली. या निवडणुकीत ते जिंकूनही आले. दरम्यानच्या काळात रामराजेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीवरुन उघडपणे नाराजी व्यक्त करत शरद पवार गटात जाण्याचा इशारा दिला होता. तसेच गेल्या महिन्यात फलटण येथील अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेत रामराजे निंबाळकर यांनी आपली नाराजी जाहीर कार्यक्रमात व्यक्त केली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला जातो अशी तक्रारही त्यांनी यावेळी केली होती. त्यानंतर अजित पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना त्रास दिला जाणार नाही. यासाठी आपण महायुतीच्या प्रमुख नेत्यांसोबत चर्चा करणार असल्याचे आश्वासनही दिले होते. दरम्यान रामराजे निंबाळकर हे शरद पवारांच्या संपर्कात असल्याची चर्चा सातत्याने होत होती. अखेर शरद पवारांच्या पक्षातील रामराजे निंबाळकर यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात अजित पवार गटासह महायुतीला हा मोठा धक्का मानला जात आहे.