टीम लोकमन मंगळवेढा |
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांची तिसरी यादी आज जाहीर झाली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 9 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यामध्ये मोहोळ विधानसभेच्या जागेवर शरद पवार गटाने अनपेक्षित अशी उमेदवारी जाहीर केली आहे.
या मतदारसंघात माजी आमदार रमेश कदम यांच्या नावाची चर्चा होती. परंतु शरद पवार गटाने रमेश कदम यांच्या कन्या सिद्धी कदम यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे माढा आणि पंढरपुरात अद्याप सस्पेंन्स कायम आहे. या मतदारसंघात कोणाला उमेदवारी मिळणार? याबाबत तर्क वितर्क काढले जात आहेत.
मोहोळ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळालेल्या सिद्धी कदम या मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांच्या कन्या आहेत. रमेश कदम हे अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात होते. त्या इमेजचा फटका बसू नये म्हणून कदाचित सिद्धी कदम यांना उमेदवारी दिल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे.
कोण आहेत सिद्धी कदम?
सिद्धी कदम या माजी आमदार रमेश कदम यांच्या कन्या आहेत. सिद्धी कदम यांचे शिक्षण टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्समधून झाले आहे. त्या एका सामाजिक संस्थेसोबत काम करतात. 2019 ची मोहोळ विधानसभा निवडणूक रमेश कदम यांनी तुरुंगातून लढवली होती. निवडणुकीत वडील तुरुंगात असताना संपूर्ण प्रचार यंत्रणा सिद्धी कदम यांनीच सांभाळली होती.
ही आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवारांची तिसरी यादी
कारंजा- ज्ञायक पाटणी
हिंगणघाट- अतुल वामदिले
नागपूर हिंगणा- रमेश बंग
अणुशक्तीनगर- फहाद अहमद
चिंचवड- राहुल कलाट
भोसरी- अजित गव्हाणे
बीड माजलगाव- मोहन बाजीराव जगताप
परळी- राजेश देशमुख
मोहोळ- सिद्धी रमेश कदम