टीम लोकमन मंगळवेढा |
मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील 35 गावचा पाणीप्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असून हा प्रश्न तात्काळ मार्गी लागावा. शासनाने याची गंभीर्याने दखल घ्यावी यासाठी शासनाला सुबुद्धी द्यावी म्हणून विठ्ठलाला साकडे घालण्यासाठी मंगळवेढा तालुक्यातील लवंगीचा युवक संग्राम माने सरकार हा लवंगी ते पंढरपूर अनवाणी पायी वारीसाठी निघाला आहे.
लवंगी ता. मंगळवेढा येथील सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, एक सुसंस्कृत, सभ्य, निष्ठावंत, कर्तव्यनिष्ठ, वचनबद्ध आणि संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी अर्पण केलेले, सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात ज्यांचा आदरयुक्त दबदबा होता असे कै. रामचंद्र माने सरकार यांचे नातू आणि संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातून लवंगी गावाचे नाव राज्याच्या कानाकोपऱ्यात ज्यांनी पोहोचवले त्या आदर्श सरपंच सरस्वती निकम यांचा भाचा संग्राम शिवाजी माने हा 35 गावच्या पाणी प्रश्नासाठी विठुरायाला साकडे घालण्यासाठी लवंगी ते पंढरपूर अनवाणी पायी वारी करण्यासाठी निघाला आहे.
लवंगी गावातील मोठा राजकीय आणि सामाजिक वारसा लाभलेले माने कुटुंब. तालुक्यातील नामांकित मोठे वलय असलेले आणि जमीनदार म्हणून ओळखणारे समृद्ध असे हे माने कुटुंब. त्या कुटुंबातील अतिशय लाडात वाढलेला सुख आणि समृद्धी ज्याच्या पायाशी लोळण घेत आहे. अशा संपन्न कुटुंबातील युवक केवळ 35 गावातील शेतकऱ्यांच्या कुटुंबात समृद्धी यावी यासाठी जीवाचे रान करत आहे.
अतिशय खडतर प्रवास करून 35 गावचा पाणी प्रश्न मिटावा म्हणून विठ्ठलाला साकडे घालण्यासाठी तो अनवाणी पाई प्रवास करत आहे. मोठा प्रवास केल्याने चालून चालून सुजलेले पाय… पायांना खडे टोचल्याने त्यातून येणारे रक्त… आणि अशा सुजलेल्या आणि रक्ताळलेल्या पावलांनी अविरतपणे पंढरीची वाट चालत आहे. हे दृश्य पाहिल्यानंतर अनेकांचे डोळे पाणावले. आणि समाजसेवेचा समृद्ध वारसा लाभलेल्या माने कुटुंबाची तिसरी पिढी देखील समाजासाठी देहभान विसरून कार्य करत आहे. हे पाहून अनेकांना कै. रामचंद्र माने सरकारांची आठवण आल्याशिवाय राहत नाही.