टीम लोकमन मंगळवेढा |
फक्त कोल्हापूरच नव्हे तर संपूर्ण राज्यसह देशाचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी तथा काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी निर्णायक आघाडी घेतली असून त्यांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.
आठ फेऱ्यांचे मतदान मोजून पार पडले असून शाहू महाराजांची लीड 54 हजारांवर पोहोचले आहे. त्यामुळे शाहू महाराज यांनी निर्णायक आघाडी घेण्यास सुरुवात केली आहे. शाहू महाराज यांची उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर महायुतीच्या नेत्यांकडून मान गादीला आणि मत मोदीला अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यात आला होता. मात्र, शाहू महाराजांनी विजयाकडे केलेली वाटचाल पाहता कोल्हापुरकरांनी मान आणि मत दोन्हीही गादीला दिल्याचे स्पष्ट दिसत आहे.
दरम्यान, निर्णायक आघाडीकडे वाटचाल सुरू केल्यानंतर श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचे सुपुत्र व माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी कोल्हापूरच्या जनतेचे आभार मानले आहेत. त्यांनी कोल्हापूर शाहू महाराजांचा असून कोल्हापुरातून विजय निश्चित होणार असल्याचे म्हटले आहे. माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी सुद्धा महाराजांच्या विजयाविषयी विश्वास व्यक्त केलाय.
दरम्यान, खासदार संजय मंडलिक हे मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच पिछाडीवर असल्याचे दिसत आहे. मंडलिक पोस्टल मतापासूनच मागे राहिले आहेत. मतमोजणीमध्ये शाहू छत्रपती यांना कोल्हापूर उत्तर, करवीर आणि राधानगरी विधानसभा मतदारसंघातून चांगले मताधिक्क्य मिळाले आहे. मात्र विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना कागल, चंदगड आणि कोल्हापूर दक्षिण मतदार संघातून मताधिक्क्य मिळत आहे परंतू ते आश्वासक नाही. मंडलिक यांना त्यांचा बालेकिल्ला असलेल्या कागल, राधानगरी आणि चंदगड विधानसभा मतदारसंघातून अपेक्षित अशी मते मिळाली नाहीत. राधानगरीतून शाहू छत्रपती यांना मोठ पाठबळ मिळालं आहे.