टीम लोकमन मंगळवेढा |
देशातील लोकसभेचा निकाल नुकताच लागला आहे. देशासह महाराष्ट्रातही सत्ताधारी पक्षांना मोठा धक्का बसला आहे. राज्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकच खासदार निवडून आला आहे. या निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. मात्र रायगडचे सुनील तटकरे याला अपवाद ठरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातून मोठा विजय संपादन केला आहे. विशेष बाब म्हणजे तटकरेंच्या या विजयामध्ये मंगळवेढा तालुक्यातील मरवडे गावच्या सुपुत्राचा खारीचा वाटा आहे.
अजित पवार गटाने एकूण चार जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यापैकी रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांनी ठाकरे गटाच्या अनंत गीते यांचा पराभव केला आहे. मतदान केलेल्या एकूण मतदारांपैकी ५०.१७ टक्के लोकांनी सुनील तटकरे यांना पसंती दिली आणि दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून दिले आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात चारपैकी केवळ एकाच जागेवर विजय मिळवता आला आहे.
रायगड लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात १३ उमेदवार होते. मात्र या मतदारसंघात मुख्य लढत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यातच होती. वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिल्याने ही लढत तिरंगी झाली होती. रायगडमध्ये राष्ट्रवादीने (अजित पवार गट) सुनील तटकरे यांना उमेदवारी दिली तर उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने अनंत गीते यांना तिकीट दिले होते. रायगड लोकसभा मतदारसंघात हे दोन जुने प्रतिस्पर्धी तिसऱ्यांदा आमनेसामने आले होते. मात्र यंदाच्या लढतीत सुनील तटकरे यांनी पुन्हा बाजी मारली आहे.
सुनील तटकरे यांनी ५०८३५२ मते मिळवत अनंत गिते यांचा पराभव केला आहे. सुनील तटकरे यांनी ही निवडणूक ८२,७८४ मतांनी जिंकली आहे. तर अनंत गीते यांना ४२५५६८ मते मिळाली आहेत. त्यामुळे सुनील तटकरे हे गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मोठ्या फरकाने निवडूण आले आहेत.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचे सुनील तटकरे यांनी रायगड मतदारसंघातून शिवसेनेच्या अनंत गीते यांचा ३१,४३८ मतांनी पराभव केला होता. सुनील तटकरे यांना ४,८६,९६८ तर शिवसेनेचे अनंत गीते यांना ४,५५,५३० मते मिळाली होती. वंचित बहुजन आघाडीच्या सुमन कोळी २३,१६ मते मिळवून तिसऱ्या स्थानावर होत्या. यापूर्वी २०१४ च्या निवडणुकीत रायगडमधून शिवसेनेचे अनंत गीते विजयी झाले होते. अनंत गीते यांनी नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये केंद्रीय कॅबिनेट मंत्री पदावर काम केले आहे.
2024 ची लोकसभा निवडणूक राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात अत्यंत चुरशीची झाली. रायगड लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतून माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते तर महायुतीकडून अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व रायगडचे विद्यमान खासदार सुनील तटकरे या दोघांमध्ये काट्याची टक्कर झाली. दोन्ही उमेदवार दिग्गज असल्याने या ठिकाणची निवडणूक दोन्हीकडून प्रतिष्ठेची केली गेली. आणि या लढतीत सुनील तटकरे यांच्या अंगावर विजयाचा गुलाल पडला. मात्र तटकरेंच्या या यशामध्ये मंगळवेढ्याच्या सुपुत्राचा खारीचा वाटा राहिला आहे.
मंगळवेढा तालुक्यातील सुपुत्र व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस लतीफभाई तांबोळी यांचेवर पक्षाने रायगड लोकसभेची जबाबदारी दिली होती. तांबोळी हे उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे अतिशय विश्वासू व जिवलग सहकारी म्हणून परिचित आहेत. तांबोळी यांनी संपूर्ण रायगड लोकसभा मतदारसंघ पिंजून काढत तटकरे यांच्या विजयासाठी जीवाचे रान केले. निवडणूक जाहीर झाल्यापासून ते मतदान होईपर्यंत अखंडित कार्यरत राहून योग्य नियोजन केले. अतिशय योग्य पद्धतीने आणि नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबवली. सुनील तटकरे हे प्रदेशाध्यक्ष असल्याने संपूर्ण राज्यभर त्यांना प्रचारासाठी जावे लागल्याने रायगड मध्ये त्यांना प्रचारासाठी कमी वेळ मिळाला परंतु तांबोळी यांनी पक्षाने दिलेली जबाबदारी मोठ्या ताकतीने आणि कर्तव्यनिष्ठेने पार पाडली. प्रचाराच्या संपूर्ण नियोजनासोबतच तांबोळी यांचेवर दुसरी अत्यंत महत्त्वपूर्ण जबाबदारी होती ती म्हणजे नरेंद्र मोदींच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या मुस्लिम समाजाची मते महायुतीच्या बाजूने वळविण्याचे. तेही काम तांबोळी यांनी मोठ्या जबाबदारीने आणि निष्ठेने पार पाडले. तेथील मुस्लिम मतदारांमध्ये जाऊन मोदींना असलेला विरोध कमी करण्यामध्ये आणि मुस्लिम समाजाचे मतदान महायुतीच्या बाजूने खेचण्यामध्ये तांबोळी यशस्वी ठरले. त्यामुळेच सुनील तटकरे यांना 2019 च्या तुलनेत जास्त मतदान झाले आणि तटकरे यांचे मताधिक्य देखील वाढले.
एकूणच तटकरेंच्या या घवघवीत यशामध्ये लतीफभाई तांबोळी या मंगळवेढा तालुक्यातील मरवडेच्या सुपुत्राचा खारीचा वाटा आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून काही महामंडळाचे वाटप देखील करण्यात येणार आहे. यामध्ये तांबोळी यांना बक्षीस म्हणून एखादे महामंडळ मिळणार? की पक्षाच्या सरचिटणीस पदावरच त्यांना समाधान मानावे लागणार. हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
मरवडे गावचे सुपुत्र लतीफभाई तांबोळी यांनी कोणताही राजकीय वारसा नसताना स्वकर्तृत्वावर राजकीय क्षेत्रात मोठी गगनभरारी घेतली आहे. अत्यंत शांत, संयमी, मितभाषी स्वभाव असलेल्या लतीफभाई यांनी मंगळवेढा तालुक्याची राजकीय राजधानी म्हणून ओळख असलेल्या मरवडे गावचे सरपंच असताना कोट्यावधी रुपयांची विकास कामे केली आहेत. पंचायत समिती सदस्य असताना पंचायत समिती गणात देखील मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. सामान्य कुटुंबातून राजकारणात आलेल्या तांबोळी यांनी आपल्या वक्तृत्वाच्या आणि कौशल्याच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष, ओबीसी सेलचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ते प्रदेश सरचिटणीस या महत्त्वाच्या पदावर कार्यरत असून प्रदेश कार्यालयाची संपूर्ण जबाबदारी ते अतिशय निष्ठेने पार पाडत आहेत. छोट्याशा गावात लघु व्यवसाय करणाऱ्या अल्पसंख्यांक कुटुंबात जन्मलेल्या लतीफभाई यांनी राजकीय क्षेत्रात घेतलेली गरुडझेप ही तरुणांसाठी प्रेरणादायी असून त्याचा आम्हाला मरवडेकर म्हणून सार्थ अभिमान आहे.
– सचिन बन्सीलाल घुले, मंगळवेढा तालुका उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार)