टीम लोकमन नांदेड |
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी इरेला पेटलेला मराठा आरक्षणाचा नेता व संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील उपोषणाचा आजचा नववा दिवस आहे. मंगळवारी मध्यरात्री पवारांचे विश्वासू शिलेदार व शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपे हे अचानक अंतरवाली सराटीत आले होते.
राजेश टोपे काहीवेळ स्टेजवर मनोज जरांगे पाटील यांच्याजवळ जाऊन बसले होते. या दोघांमध्ये काही चर्चा झाली किंवा नाही किंवा नेमकी काय चर्चा झाली. याबाबत नेमकी माहिती नाही. मात्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे हे काहीवेळ मनोज जरांगे यांच्या उशापाशी बसून होते. त्यानंतर राजेश टोपे यांनी जरांगे पाटलांच्या काही सहकाऱ्यांसोबतही चर्चा केली.
मंगळवारी रात्री 12 वाजण्याचे सुमारास राजेश टोपे यांनी आंदोलनस्थळी जाऊन मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची त्यांच्या सहकाऱ्यांकडून चौकशी केली होती. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना उपचार घेण्याचीही विनंती केली. राजेश टोपे गेल्यानंतर मनोज जरांगे यांची प्रकृती फारच खालावत असल्याने आंदोलकांनी सहकाऱ्यांच्या विनंतीवरून मनोज जरांगे यांनी मध्यरात्री वैद्यकीय उपचार घेतले असल्याचे समजते.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा नववा दिवस आहे. गेल्या काही दिवसांत त्यांची प्रकृती अधिकच खालावत चालली आहे. मनोज जरांगे पाटील यांचा रक्तदाब सातत्याने वरखाली होत आहे. अशक्तपणामुळे त्यांना चालणे आणि एका जागेवर बसणेही मुश्कील झाले आहे. शरीरातील पाण्याची पातळी प्रचंड खालावल्याने मनोज जरांगे पाटील यांना चक्करही येत आहे. तरीही मनोज जरांगे पाटील हे वैद्यकीय उपचार घ्यायला तयार होत नाहीत.
काही दिवसांपूर्वीच संभाजीराजे छत्रपती यांनी उपोषणस्थळी भेट देऊन मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती वेगाने खालावतच आहे. त्यामुळे आता राज्य सरकार यासंदर्भात काय पावले उचलणार हे पाहावे लागेल.
जिल्हाधिकाऱ्यांकडून मनोज जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याची विनंती
मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी मध्यरात्री गावकरी आणि सहकाऱ्यांच्या आग्रहाने वैद्यकीय उपचार घेतले. रात्री एकच्या सुमारास त्यांना सलाईन लावण्यात आले. जिल्हाधिकारी श्रीकृष्ण नाथ पांचाळ आणि पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी जरांगे पाटील यांना उपचाराला सहकार्य करत उपोषण मागे घेण्याची विनंती देखील केली.
मनोज जरांगे पाटील यांच्या जीवास इजा झाली तर राज्य सरकार जबाबदार असेल : पृथ्वीराज चव्हाण
राज्य सरकारने तातडीने मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करुन उपोषणाबाबत तातडीने तोडगा काढावा. आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा नववा दिवस आहे. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असल्याची माहिती समोर येत आहे. मनोज जरांगे यांचा जीव वाचवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मनोज जरांगे यांना काही इजा झाली तर त्याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असेल. असा इशाराही पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला.
मनोज जरांगे यांचे उपोषण आणखी काही काळ सुरु राहिल्यास मराठा आंदोलक आक्रमक होण्याची शक्यता आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यास साधारण 20 दिवसच बाकी असल्याचे सांगितले. त्यादृष्टीने पुढील काही दिवस हे मराठा आरक्षण आंदोलनाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहेत.