टीम लोकमन मंगळवेढा |
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पक्ष स्थापनेनंतर पहिल्यांदाच मंगळवेढा दौऱ्यावर येत असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते व पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील मनसेचे अधिकृत उमेदवार दिलीप धोत्रे यांनी दिली.
बुधवार दिनांक 6 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार दिलीप धोत्रे यांच्या प्रचारार्थ मंगळवेढ्याच्या शिवप्रेमी चौकातील आठवडा बाजार येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे.
विधानसभेच्या आखाड्यामध्ये उमेदवार उतरण्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. त्याचवेळी पंढरपूर विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील पहिल्या पाच उमेदवारात दिलीप धोत्रे यांचे नाव निश्चित केल्यामुळे या निवडणुकीच्या आखाड्यात रंगत निर्माण झाली.
दिलीप धोत्रे यांनीही या मतदारसंघात अधिक सक्रिय होत मतदारसंघातील प्रश्नावर आवाज उठवण्याची भूमिका सुरू केली. विशेषता राज ठाकरे यांनी पंढरपूर मतदारसंघांमध्ये वैयक्तिक लक्ष घातले असून गत महिन्यामध्ये तालुक्यातील कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेस युवासेना अध्यक्ष अमित ठाकरे हे उपस्थित राहिले होते. कुस्तीबरोबर अमित ठाकरे यांच्या स्वागताला मंगळवेढेकरांनी मोठी गर्दी केली होती. मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांनी उमेदवारी अर्ज भरताना बिरोबा (हुन्नूर), महालिंगराया (हुलजंती), दामाजी (मंगळवेढा), संत चोखामेळा (मंगळवेढा) व विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
निवडणुकीच्या अगोदर मतदार संघातील नागरिकांना काशी, आयोध्या, तुळजापूर, कोल्हापूरची, आदमापूरला या ठिकाणचे तिर्थ यात्रा घडवून आणली याशिवाय मुस्लिम बांधवांना अजमेर, बौद्ध बांधवांना दीक्षाभूमी नागपूर यात्रा काढून दर्शन घडवले. पाच वर्षाच्या कार्यकाळात महाविकास आघाडी व महायुती या दोन्हींना सत्तेत राहण्याचा योग मिळाला. मात्र मतदारसंघातील प्रमुख प्रश्न प्रलंबित राहिल्यामुळे त्या प्रश्नावर आवाज उठवण्यास सुरुवात केली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे पहिल्यांदा मंगळवेढा दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे या दौऱ्यात राज ठाकरे कोणत्या मुद्द्यावर भाष्य करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. राज ठाकरे आणि दिलीप धोत्रे यांचे अतिशय सलोख्याचे संबंध आहेत. मनसेच्या राज्य पातळीवरील प्रमुख नेत्यांमध्ये दिलीप धोत्रे यांचा उल्लेख होतो. दिलीप धोत्रे हे राज ठाकरेंचे अतिशय विश्वासू शिलेदार म्हणून ओळखले जातात. त्यांच्यावर राज ठाकरे यांचे विशेष प्रेम आहे. म्हणूनच त्यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे स्वतः मैदानात उतरले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील धडाडीच्या नेत्यांमध्ये दिलीप धोत्रेंचा उल्लेख होतो. दिलीप धोत्रे यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात विद्यार्थी सेनेतून केली. सुरुवातीपासून ते राज ठाकरे यांचे समर्थक म्हणून कार्यरत आहेत. राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर दिलीप धोत्रे यांनी त्यांना साथ देत त्यांच्यावरची निष्ठा कायम ठेवली. राज ठाकरे यांच्या सभांना सर्वत्र मोठी गर्दी होते. तरुणांमध्ये राज ठाकरेंची मोठी क्रेझ आहे. परंतु आत्तापर्यंत एकदाही राज ठाकरेंना सत्तेत स्थान मिळाले नाही. तरीसुद्धा दिलीपबापू राज साहेबांसोबत उभे राहिले. त्यांनी निष्ठा आणि पक्ष कधीच बदलला नाही. एक कडवा मनसैनिक म्हणून राज्यभर त्यांची ओळख आहे.
राज ठाकरेंच्या सभेचा महायुतीला फटका?
देशात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र राज्यात राज ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीला बिनशर्त पाठिंबा दिला होता आणि महायुतीसाठी राज्यभर सभाही घेतल्या होत्या. मनसेचे वजन त्यांनी माहितीच्या पारड्यात टाकले होते. परंतु विधानसभेला काही प्रमाणात चित्र बदलल्याचे दिसत आहे. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात महायुतीतून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार समाधान आवताडे निवडणूक लढवत आहेत तर त्यांचे विरोधात राज ठाकरे यांनी मनसेच्या दिलीप धोत्रे यांना मैदानात उतरवले आहे. त्यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे बुधवारी मंगळवेढ्यात येत असून ते दिलीप धोत्रे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेणार आहेत. मंगळवेढ्यातील तरुणांमध्ये राज ठाकरेंची मोठी क्रेझ आहे. राज ठाकरेंच्या भाषणाचे चाहते मंगळवेढ्यात मोठ्या प्रमाणात आहेत. इतर पक्षांमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना देखील राज ठाकरेंच्या भाषणाची भुरळ आहे. राज ठाकरे मंगळवेढ्यात काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले असले तरी राज ठाकरेंच्या सभेचा परिणाम महायुतीवर होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
मनसेच्या फायद्यापेक्षा महायुतीच्या तोट्याचीच जास्त चर्चा?
आपल्या निष्ठावंत शिलेदाराला मनसेच्या इंजिनात बसवून विधानसभेत पाठवण्यासाठी राज ठाकरेंनी देखील कंबर कसली असून दिलीप बापूंच्या प्रचारासाठी राज ठाकरे मंगळवेढा येथे जाहीर सभा घेणार आहेत. राज ठाकरेनी शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केल्यानंतर पहिल्यांदाच ते मंगळवेढ्यात येत असून दामाजी पंतांच्या नगरीत राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. राज ठाकरेंच्या सभेकडे विरोधी पक्षाचेही डोळे लागलेले असतात. राज ठाकरे आपल्या भाषणातून कोणावर काय निशाणा साधतील हे सांगता येत नाही. अचूक टायमिंग साधून मोजक्या शब्दात बोचरी टीका करत ते विरोधकांचा नेहमीच समाचार घेत असतात. आता मंगळवेढ्यातील सभेत ते कोणाचा समाचार घेतात याची उत्सुकता सर्वांनाच आहे. त्यांच्या भाषणाचा मंगळवेढ्यातील तरुणांवर मोठा प्रभाव पडू शकतो. त्यांच्या सभेने दिलीप बापूंना मोठे बळ मिळणार आहेच. परंतु राज ठाकरे यांच्या मंगळवेढ्यातील सभेचा दिलीप धोत्रे यांना किती फायदा होणार यापेक्षाही राज ठाकरेंच्या मंगळवेढ्यातील सभेचा महाविकास आघाडी पेक्षाही महायुतीलाच मोठा तोटा होणार असल्याची चर्चा जास्त होत आहे.