टीम लोकमन सोलापूर |
वेळापूर ता.माळशिरस येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सोलापूर मधील नार्थकोट हायस्कूल मध्ये स्थलांतर करण्यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागणीचा प्रस्ताव सादर केला असल्याची माहिती सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी दिली.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेची (DIET) स्थापना ही राष्ट्रीय शिक्षण धोरण १९८६ च्या शिफारशीने आणि केंद्र शासनाच्या मूळ मार्गदर्शक पिंक सूचना पत्रिका १९८९ प्रमाणे करण्यात आली आहे. देशभरात प्रत्येक जिल्ह्यासाठी एक अशी संस्था प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावण्याच्या उदात्त हेतूने स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये शिक्षण उपसंचालक दर्जाचे १ प्राचार्य, वर्ग १ चे एकूण ४ अधिकारी, वर्ग २ चे एकूण ६ अधिकारी आणि १५ शिक्षकेतर पदे सदर कार्यालयासाठी मंजूर आहेत. जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था, सध्या वेळापूर ता. माळशिरस या कार्यालयामार्फत सन २०२३-२४ मध्ये एकूण २१,६२२ शिक्षकांचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे. तसेच राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण आयोजन करणे, संशोधन, शिक्षण परिषदांचे आयोजन व मार्गदर्शन करणे. शासनाचे गुणवत्ता वाढीचे उपक्रम राबवणे, यशदा अंतर्गत जिल्ह्यातील गट क व ड कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेणे, जिल्ह्यातील डी.एल.एड. कॉलेजचे सनियंत्रण करणे इ. कार्ये केली आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील शालेय शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी काम करणारे डाएटचे जिल्हास्तरीय कार्यालय सोलापूर शहर या जिल्हा मुख्यालयापासून जवळपास ११० किलोमीटर दूर आणि गैरसोयीच्या ठिकाणी आहे. तसेच वेळापूर बसस्थानकापासून ३ किलोमीटर दूर माळावर आहे. की ज्या ठिकाणी बस थांबा नाही. या संस्थेमार्फत पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरावरील शैक्षणिक गुणवत्ता वाढीबाबत आढावा, मार्गदर्शन व सहाय्य करणे हे कार्य केले जाते तसेच विविध प्रशिक्षणांचे व्यवस्थापन, नियोजन व अनुधावन करून जिल्ह्यातील शिक्षक, क्षेत्रीय अधिकारी यांचे सक्षमीकरण करण्यासाठी कार्य केले जाते.
यशदा, पुणे या संस्थेमार्फत सलंग्नित राहून जिल्ह्यातील वर्ग ३ व वर्ग ४ कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण देणारी जिल्हास्तरीय शिखर संस्था म्हणून कार्य करण्याची जबादारी आहे. सदरच्या सर्व प्रशिक्षणासाठी सोलापूरचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक व योजना तसेच इतर काही विभाग प्रमुखांशी वेळोवेळी समन्वय साधावा लागतो. प्रस्तुत कार्यालय वेळापूर ता. माळशिरस येथे असल्याने जिल्हा मुख्यालयातील कार्यालयाशी प्रत्यक्ष समन्वय साधताना वारंवार अडचणी येतात. सदर कार्यालय हे नॉर्थकोट हायस्कूल, सोलापूर शहर येथील इमारतीत स्थलांतरित करणेबाबत बाबत संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांनी राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव यांना पत्र दिले आहे.
प्रस्तुत कार्यालय सोलापूर शहर या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी स्थलांतरित झाल्यास जिल्ह्यास फायदे होणार आहेत.
1) विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या शिक्षक प्रशिक्षणांचे सनियंत्रण व व्यवस्थापन करणे.
2) जिल्ह्यातील शिक्षकांना सोलापूर शहर या मुख्यालयाच्या ठिकाणी येऊन प्रस्तुत कार्यालयास कामकाजासाठी येणे सोयीस्कर होईल.
3) सोलापूर शहर या जिल्हा मुख्यालयी असणाऱ्या सर्व विभाग प्रमुखांशी प्रत्यक्ष समन्वय साधता येईल.
4) वेळापूर येथील कार्यालयास जाण्यासाठी वाहतुकीची गैरसोय कमी होईल.
5) समग्र शिक्षा अंतर्गत प्रस्तुत कार्यालयाच्या आस्थापनेवरील कार्यरत विषय साधन व्यक्ती, विशेषतज्ञ व विशेष शिक्षक असे एकूण १८४ कर्मचारी यांच्यावर सनियंत्रण करणे व आढावा घेणे बाबतचे कामकाज परिणामकारकता वाढेल.
6) जिल्ह्यातील शिक्षकांना कृती संशोधन व नवोपक्रम बाबत मार्गदर्शन घेण्यासठी वेळापूर ऐवजी सोलापूर जिल्हा मुख्यालय हे येण्या जाण्यासठी सोयीस्कर राहिल.
7) जिल्हा परिषद मधील शिक्षण विभाग अंतर्गत होणाऱ्या साप्ताहिक व मासिक सभेस उपस्थित राहण्यासाठी पैशाची व वेळेची बचत होईल.
8) राज्य प्रशिक्षण धोरण २०११ अंतर्गत सामान्य प्रशासन विभागाने जिल्ह्यातील वर्ग ३ व वर्ग ४ कर्मचार्यांचे प्रशासकीय प्रशिक्षण आयोजित करण्याची जबाबदारी प्रस्तुत कार्यालयास दिलेली आहे. सदरचे प्रशिक्षण हे सोलापूर शहर या ठिकाणी आयोजित करावे लागतात. सदरचे प्रशिक्षण हे जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्याशी समन्वय साधून पूर्ण करावी लागतात.
9) वेळापूर येथील कार्यालयामुळे सदर प्रत्यक्ष समन्वय साधताना जास्त वेळ लागतो त्यामुळे प्रस्तुत कार्यालय सोलापूर शहर याठिकाणी असणे क्रमप्राप्त ठरते.
10) जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने तसेच शिक्षक, मुख्याध्यापक, सर्व पर्यवेक्षीय अधिकारी यांच्याशी समन्वय साधण्याचे काम आणखीन परिणामकारक होण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, वेळापूर हे कार्यालय सोलापूर शहर या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी स्थलांतरित होणे अत्यावश्यक आहे.