टीम लोकमन सोलापूर |
मुंबई शिक्षक मतदारसंघाचे नूतन आमदार ज. मो. अभ्यंकर यांचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने स्वागतपर सत्कार करण्यात आला. शिवाय शिक्षकांच्या राज्यस्तरावरील विविध महत्त्वाच्या विषया संदर्भात निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.
विधानपरिषद निवडणूकीतील यशानंतर आमदार अभ्यंकर हे सोलापूर दौऱ्यावर आले असता सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. शिक्षक समितीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सुरेश पवार यांनी शिक्षण सहसंचालक, सर्व शिक्षा अभियान प्रकल्प संचालक अशा विविध महत्त्वाचा पदांवर जबाबदारीने आमदार अभ्यंकर यांनी काम केले आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांची पूर्णतः जाण असलेल्या अधिकाऱ्याला विधीमंडळात काम करण्याची संधी मिळालेबद्दल आनंद व्यक्त केला.
तसेच शिक्षण क्षेत्रातील सध्याच्या ज्वलंत प्रश्नांचे बाबतीत मनोगतातून ऊहापोह केला. यामध्ये शिक्षक संच मान्यता आदेश, जुनी पेन्शन, विद्यार्थी गणवेश योजना, शिक्षण खात्यातील सर्व रिक्तपदे, अशैक्षणिक कामे, आश्वासित प्रगती योजना अशा विविध प्रश्नी शासन स्तरावर आवाज उठवावा अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच समग्र शिक्षा अभियानात कार्यरत विषय शिक्षकांना न्याय मिळवून द्यावा अशी आग्रही मागणी केली.
आमदार अभ्यंकर यांनीही शिक्षक समितीच्या वतीने दिलेल्या निवेदनातील मुद्यांवर अर्धा तास अतिशय अभ्यासपूर्ण असे मार्गदर्शन केले. 15 मार्च 2024 चा संच मान्यतेच्या संबंधी निघालेला शासन निर्णय रद्द व्हावा. यासाठी प्रसंगी रस्त्यावरची लढाई तीव्रतेने लढावी लागेल त्यासाठी सिद्ध व्हा. असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. शिवाय शासनकर्यांच्या उदासीन धोरणांमुळे शिक्षणांसह सर्वच क्षेत्रातील रिक्त पदांमुळे कामकाजावर विपरीत परिणाम होत असल्याचे निदर्शनास आणून दिले.
यावेळी माजी शिक्षण सहसंचालक प्रदीप मोरे, शिक्षणाधिकारी कादर शेख यांनीही त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी जिल्ह्यातील खाजगी, माध्यमिक तसेच विविध संस्था – संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी शिक्षक समितीचे पदाधिकारी राजन सावंत, शरद रुपनवर, मो.बा. शेख, संतोष हुमनाबादकर, राजन ढवण, संतोष रुपनवर, उम्मीद सय्यद इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.