टीम लोकमन सोलापूर |
उत्तर सोलापूर तहसील कार्यालयातील लिपिक अतुल अशोक रणसुबे (वय ४१) यास १५ हजार रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.
यातील तक्रारदाराची जमीन राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित झाली होती. पण सातबारा उताऱ्यावर दाखविलेली जमीन आणि प्रत्यक्षात संपादित झालेली जमीन यात तफावत होती. त्याबद्दल तक्रारदाराने तहसील कार्यालयाकडे अर्ज केला होता. ती चूक दुरुस्त करून देण्यासाठी लिपिक अतुल रणसुबे याने तक्रारदाराकडे १५ हजार रुपयांची लाच मागितली होती. आज गुरुवारी लाचेची रक्कम रणसुबे याने तक्रारदाराकडून तहसील कार्यालयातच स्विकारली.
लाचलुचपत विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक यांच्या पथकाने उपअधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली आहे.