माडग्याळ : नेताजी खरात
केंद्र सरकारकडून एक जुलैपासून अमलात आलेल्या नवीन कायद्यासंदर्भात जत तालुक्यातील उमदी पोलिस ठाणे अंतर्गत पत्रकार व पोलीस पाटील यांचे चर्चासत्र आणि मार्गदर्शन शिबिराचे उमदी पोलीस ठाण्यामध्ये आयोजन करण्यात आले होते.
देशभरात एक जुलैपासून तीन नवीन फौजदारी कायदे लागू करण्यात आले आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता ,भारतीय न्याय संहिता आणि भारतीय पुरावा कायदा हे तीन नवे फौजदारी कायदे देशात लागू झाले आहेत नवीन कायद्यानुसार काही कलम हटवण्यात आले असून काही नवीन कलम जोडण्यात आली आहेत.
कायद्यामध्ये नवीन कलमांचा समावेश केल्यानंतर पोलीस वकील आणि न्यायालय तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या कार्यपद्धतीत मोठे बदल होणार आहेत. याबाबतची प्रोसिजर व माहिती यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांनी पत्रकारांना व पोलीस पाटलांना दिली.
एक जुलै पूर्वी नोंदवलेल्या खटल्यावर आणि खटल्यांच्या तपासावर नव्या कायद्याचा कोणताही परिणाम होणार नाही. तसेच एक जुलैपासून नवीन कायद्यानुसार सर्व गुन्ह्याची नोंद केली जाईल.
कोर्टामध्ये जुन्या खटल्याची सुनावणी जुन्या कायद्यानुसारच होईल नवीन कायद्याच्या कक्षेमध्ये नवीन प्रकरणाची चौकशी आणि सुनावणी केली जाईल गुन्ह्यासाठीची प्रचलित असलेले कलम आता बदलण्यात आले आहे त्यामुळे न्यायालय पोलीस आणि प्रशासनाला नव्या कलमांचा अभ्यास करावा लागणार आहे. या चर्चासत्रासाठी परिसरातील विविध दैनिक, न्यूज पोर्टल, यूट्यूब चॅनलचे प्रतिनिधी व पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.