श्री संत सेनाजी महाराज केश शिल्पी महामंडळाकरिता 1000 कोटी रुपये निधीची तरतूद करावी. अध्यक्ष तथा कार्यकारी कार्यकारी मंडळाची त्वरित नेमणूक करून श्री संत सेनाजी केशशिल्पी महामंडळ कार्यान्वित करावे. या प्रमुख मागणीसाठी सकल नाभिक समाज महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्रातील सर्व नाभिक समाज संघटनांच्या वतीने 30 सप्टेंबर 2024 रोजी आझाद मैदान येथे सकाळी 10 ते 5 या वेळेत महाधरणे आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
शासनाकडे नाभिक समाजाच्या अनेक मागण्या गत अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत मोर्चा आंदोलने निवेदने याद्वारे प्रयत्न करून देखील राज्यकर्त्यांनी नाभिक समाजाच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याने नाभिक समाज न्याय हक्कापासून वंचित राहिलेला आहे. नाभिक समाजाच्या आर्थिक शैक्षणिक विकासासाठी श्री संत सेना महाराज आर्थिक विकास महामंडळ व्हावे या प्रमुख मागणीसह एकूण 22 मागण्या 6,7 ऑक्टोबर 2006 रोजी महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या रौप्यमहोत्सवी राज्यव्यापी अधिवेशनात 50 ते 60 हजार समाज बांधवांच्या उपस्थितीत तसेच त्यानंतर 30 मे 2011 रोजी आझाद मैदानात लाखो नाभिक समाज बांधवांच्या उपस्थितीत महामोर्चाद्वारे करण्यात आल्या होत्या. नागपूर व येथे होणाऱ्या अधिवेशनातही सातत्याने नाभिक समाजाच्या न्याय हक्कासाठी धरणे. मोर्चे आणि निदर्शने समाजाने संघटित होऊन केलेले आहेत. यावेळी केलेल्या मागण्यांमध्येही श्री संत सेना महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापित करावे या प्रमुख मागणीचा समावेश होता.
अधिवेशन आणि महामोर्चा नंतर शासन स्तरावर आर्थिक विकास महामंडळासह अनेक मागण्या बाबत सचिव पातळीवर कामकाज देखील चालले होते. तसेच या मागण्यांबाबत गेले अनेक वर्ष आम्ही सातत्याने पाठपुरावाही करीत आलेलो आहोत. यानंतरच्या काळात उत्तर भारतात मध्य प्रदेश झारखंड, हरियाणा आधी राज्यात नाभिक समाजाच्या उन्नती व विकासासाठी केस शिल्पी महामंडळ तयार करण्यात येऊन त्यावर नाभिक समाजातील नेतृत्वाला राज्यमंत्र्याचा दर्जा देऊन अध्यक्ष तथा पदाधिकारी म्हणून शासनाच्या वतीने नेमणूक करण्यात आली होती. याच धरतीवर महाराष्ट्रातही श्री संत सेना महाराज केश कला बोर्डाची स्थापना व्हावी व या माध्यमातून सलून व्यावसायिक व नाभिक समाजातील महिला व विद्यार्थी यांचे प्रश्न मार्गी लागावेत या दृष्टीने मध्यप्रदेश येथील तत्कालीन केशशिल्पी बोर्डाचे अध्यक्ष नंदकुमार जी वर्मा यांच्याशी संपर्क करण्यात आला.
पुणे येथे हुतात्मा भाई कोतवाल कार्यगौरव पुरस्काराचे
आयोजन नाभिक एकता महासंघ व महाराष्ट्र नाभिक महामंडळ तसेच इव्हेंट इंडिया या संस्थेच्या वतीने २०१८ मध्ये गणेश कला क्रीडा मंडळ या ठिकाणी भव्य प्रमाणात करण्यात आले होते. त्याप्रसंगी मध्य प्रदेश केशशिल्पी बोर्डाचे अध्यक्ष नंदकुमारजी वर्मा यांना प्रमुख अतिथी म्हणून बोलविण्यात आले होते. या कार्यक्रमाला येताना मध्य प्रदेशातील केशशिल्प बोर्ड स्थापन केल्याचा मसुदा घेऊन येण्याचा आग्रह आम्हीकेला होता. महाराष्ट्रात केशशिल्पी महामंडळ स्थापन करण्याच्या दृष्टीने आवश्यक व मार्गदर्शक असलेला संपूर्ण मसुदा ते घेऊन आले होते.
याविषयी दत्ता अनारसे यांनी मला विचारले की या महामंडळाकरिता कुणाचे नाव सुचवायचे, त्यावेळेला मी त्यांना सांगितले की भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे तेव्हा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी असावा म्हणून मी महामंडळाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री बंडू राऊत यांचे नाव सुचविले बंडू राऊत यांचा माननीय नितीन गडकरी साहेब आणि माननीय फडवणीस साहेब यांच्याशी संपर्क होताच त्यामुळे त्यांच्याकडे संबंधित कागदपत्र त्यांच्याकडे सोपविण्यात आली. बंडू राऊत हे नागपूर येथील रहिवासी असल्याने तसेच भारतीय जनता पक्षाचे क्रियाशील कार्यकर्ते असल्याने त्यांनी माननीय नामदार देवेंद्रजी फडवणीस साहेब यांच्याशी संपर्क करून केशशिल्पी महामंडळाचा मध्यप्रदेशचा मसुदा त्यांनी त्यांच्याकडे सादर केला. त्यानुसार माननीय देवेंद्रजी फडवणीस साहेब यांनी श्री संत सेनाजी केशशिल्पी महामंडळाच्या निर्मिती करिता मंत्रिमंडळात मंजुरी दिली. त्यानंतर अध्यक्षपदासाठी बंडू राऊत यांचे नाव घोषित झाले. तेव्हा निवडणुकीचा काळ अवघा पंधरा दिवसात वर आला होता आणि आचारसंहिता लागल्याने पुढील कार्यवाही होऊ शकली नाही.
निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात उलथापाल होऊन माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचे सरकार आले त्यांच्या कार्यकाळात त्यांनी या महामंडळाबाबत दखल घेतली नाही. त्यातच कोरोना सारख्या महाभयंकर महामारीची जीवघेणी साथ आली त्यामुळे आमचा प्रश्न हा प्रश्नच राहिला. त्यानंतर याबाबत पुढे काही कारवाई होऊ शकली नाही. कोरोनाच्या काळात आरोग्याच्या कारणासाठी सलून व्यवसाय हा बंद ठेवण्यात आला होता त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच सलून व्यवसायिक हे हवालदिल झाले होते आर्थिक संकटात सापडले होते. राज्यकर्त्यांकडे माझ्यासह महाराष्ट्रातील सर्व संघटना समाज नेत्यांनी सामाजिक संस्थांनी नाभिक व्यावसायिकांना शासनाच्या वतीने मदत मिळावी अनुदान मिळावे या आपत्तीच्या काळात शासनाचे सहकार्य लाभावे याकरिता प्रयत्नशील होतो. परंतु वारंवार मागणी करूनही नाभिक समाजाला अपेक्षित असलेली मदत मिळू शकली नाही.याचा खेद आजही मनात आहे. कोरोना काळात आर्थिक कारणासह कौटुंबिक, व्यावसायिक कारणाने हतबल होऊन अनेक आत्महत्याही झाल्या तरीही शासनाकडून मदत मिळाली नाही. अशा प्रकारे अनेक वर्षापासून सातत्याने प्रयत्न करूनही राज्यकर्त्यांनी शासनकर्त्यांनी आम्हाला नेहमीच दुर्लक्षित केल्याचे दिसते आहे.
पुढे माननीय नामदार फडवणीस साहेब यांच्या संगनमताने व भारतीय जनता पक्षाच्या पुढाकाराने माननीय श्री नामदार एकनाथ रावजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले महाराष्ट्रातील नाभिक समाजाच्या आशा पल्लवीत झाल्या. माननीय फडवणीस साहेब यांच्या कार्यकाळात घोषित केलेल्या केशशिल्पी महामंडळाच्या कार्यास चालना मिळेल असा विश्वास आमच्या मनात निर्माण झाला. याचदरम्यान उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार अर्थमंत्री असताना अर्थसंकल्पात अर्थसंकल्पाच्या शेवटी नाभिक समाजासाठी तयार करण्यात आलेल्या श्री संत सेनाजी केशशिल्पी महामंडळाकरिता ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. तदनंतर केशशिल्प महामंडळाकरिता 1000 कोटी निधी उपलब्ध करावा तसेच घोषित केलेल्या महामंडळाच्या रचनेत बदल करून सलून व्यावसायिकांसह नाभिक समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती व नाभिक समाजातील महिला व इतर व्यवसायिकांना कमी व्याजदराचे आणि दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध व्हावे तसेच लवकरात लवकर कार्यकारी मंडळ घोषित करावे असा पत्रव्यवहार केल्यानंतर महामंडळाच्या रचनेत काहीसा बदल झाल्याचे जाणवते.
आत्ताही निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आहेत कधीही निवडणुकीची आचार संहिता ही लागू होईल. अजूनही नाभिक समाजाच्या विकासाच्या दृष्टीने तयार करण्यात आलेले केशशिल्पी महामंडळासाठी अपेक्षित असलेला निधी उपलब्ध झालेला नाही. अध्यक्ष व सदस्यांची नेमणूकही झालेली नाही याबाबत शासनाने राज्यकर्त्यांनी त्वरित निर्णय घेऊन हे महामंडळ कार्यान्वित करावे अशी अपेक्षा नाभिक समाजाची आहे या मागणी करिताच३० सप्टेंबर रोजी मुंबई येथेआझाद मैदानावर एकदिवशीय महाधरणे आंदोलन करण्याचा निर्धार सकल नाभिक समाजाने केला आहे. निवडणुका घोषित होईल महिन्या दोन महिन्यात आचार संहिताही लागल्यास खऱ्या अर्थाने अपेक्षित असलेले केस शिल्पी मंडळ अस्तित्वात येणार नसल्याने त्यामुळे महाराष्ट्रातील नाभिक समाजाचा अपेक्षाभंग होत असल्याचे चित्र समाज मनामध्ये निर्माण झाले आहे.
नाभिक समाजाचे प्रश्न समस्या आणि केश शिल्पी महामंडळ या दृष्टिकोनातून सागर बंगल्यावर नुकतीच एक बैठक संपन्न झाली त्या बैठकीत आलेल्या अनेक संघटना व कार्यकर्ते अनेकार्थी निराश झाले. याबाबत राज्यभरात सोशल मीडियाच्या माध्यमातून नाभिक समाजाच्या मनातील राग, संताप व्यक्त होताना दिसतो आहे. क्रांतीमित्र किरण भांगे यांच्या पुढाकाराने एकीकडे नाभिक समाजाला न्याय मिळावा यासाठी सकल नाभिक समाजाच्या वतीने ३० सप्टेंबर रोजी महाधरणे आंदोलन करण्याचा निर्धार केला असून त्या स राज्यभरातून नाभिक समाज व अनेक संघटनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
दुसरीकडे मात्र केश शिल्पी महामंडळावर अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य पदाकरिता इच्छुकांची संख्या तिन्ही पक्षाकडे शेकडोंनी आहे सत्तापद पाहिजे, राज्यमंत्र्याचा दर्जा असलेल्या महामंडळावर अध्यक्ष म्हणून नेमणूक व्हाव या करिता अनेक आमदार खासदार यांच्या शिफारशी जमा करून प्रयत्न करणाऱ्या इच्छुकांनीही समाजाने पुकारलेल्या आंदोलनात सहभाग होणे आवश्यक असताना ते तटस्थ भूमिकेत असल्याचे दिसत आहे. त्यांनी राजकीय पक्ष समाजाचे प्रश्न दोहो पैकी एकाचाच. प्रथमस्थानी विचार करावा. समाज पाठीशी असेल तरच राजकीय पक्ष तुमचा विचार करणार आहे. अन्यथा आपले महत्त्व शून्य त्यामुळे नंतर समाजानेही आपल्याकडे आणि आपल्या पक्षाकडेही पाठ फिरवली तर काय होईल याचा विचार करावा, प्रथम समाजाचे प्रश्न सोडविणे आणिसमाजावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी. हे आपले प्रथम कर्तव्य आहे. याचा विचार हवेत असणाऱ्या नेत्यांनी करावा हीच अपेक्षा.
10 सप्टेंबर रोजी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे तहसीलदार कचेरीसमोर आदर्श नाभिक संघटनेचे पदाधिकारी श्री किसन खंडागळे हे आमरण उपोषणास बसले. त्यामुळे महाराष्ट्रातील नाभिक समाजावर अन्याय होत असल्याची भावना दृढ झाली समाजाला त्यांच्या हक्कापासून डावलण्यात येत असल्याचे ठाम मत नाभिक समाजाचे झालेले आहे. यासाठी संघटित होऊन आंदोलनाशिवाय पर्याय नाही, म्हणूनच आझाद मैदान मुंबई येथे 30 सप्टेंबर रोजी एक दिवशीय धरणे आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी सर्व संघटना आणि नेते यांच्यासह सकल नाभिक समाजाच्या बॅनरखाली एकत्रितपणे आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला असून स्वयंस्फूर्तीने समाज बांधव या आंदोलनात हजारोंच्या संख्येने सहभागी होणार आहेत.
आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून दिनांक 15 सप्टेंबर पासून प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार यांना वरील मागण्यासंबंधी स्थानिक संघटना, संस्था, व नाभिक समाजाच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहेत. आपल्याच न्याय हक्कासाठी या आंदोलनात सहभागी होऊन मीच नेता मीच कार्यकर्ता या भूमिकेतून या आंदोलनाची सनदशीर मार्गाने, शिस्तबद्ध पद्धतीने तयारी करावी असे मनोगत सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसते. लढाई लढल्याशिवाय जिंकता येत नाही आणि आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही म्हणून 30 सप्टेंबरच्या एक दिवशीय महाधरणे आंदोलनाकरता महाराष्ट्रातील समाजमन अधीर झाले आहे. सध्याची राजकीय स्थिती दोलायमान अवस्थेत आहे. सर्वच राजकीय पक्ष मतांची जुळवा जुळव करण्याकरिता प्रयत्नशील आहेत. नाभिक समाज देखील राज्यातला एक मोठा जागृत आणि संघटित समाज आहे राजकारण्यांनी या समाजाच्या प्रश्नांकडे डोळे झाक करून कसे चालणार सर्वच राजकीय पक्षांना निवडणुकीच्या दृष्टीने नाभिक समाजाची ही मते हवी आहेत.याची जाण नाभिक समाजातील संघटना आणि नेतृत्वालाही आहे.तेव्हा लढा आणि संघर्ष करण्याची हीच खरी वेळ असल्याने आता नाही तर केव्हाच नाही. या भूमिकेतून सामाजिक न्यायहक्कासाठी लढा पुकारण्यात आलेला आहे.
नाभिक समाजाचे हे स्वयंस्फूर्तीने होत असलेले आंदोलन विविध मार्गाने विस्कळीत करण्यासाठी तसेच नाभिक ऐक्यामध्ये खोडा घालण्यासाठी काही विघ्न संतोषी लोक प्रयत्न करतीलच, परंतु हे समजण्याइतपत नाभिक समाज खुळा राहिलेला नाही समाज हित लक्षात घेऊनच समाजावर होणारा अन्यायाला वाचा फोडण्यासाठी समाज संघटित होऊन संघर्ष करण्याच्या तयारीत आहे सनदशीर मार्गाने प्रश्न सुटला नाही तर येत्या निवडणुकीत संघटना, पदाधिकारी, कार्यकर्ते राजकीय पक्षांबाबत योग्य तो निर्णय घेतील.
केशशिल्पी महामंडळाच्या कार्यालयाच्या वतीने एक लक्ष रुपयापर्यंतचे कर्ज करिताअर्ज वितरित करण्यात येत आहेत. यावर समाधान मानून चालणार नाही हे. मृगजळासारखे आहे. नाभिक समाजाच्या केश शिल्पी महामंडळाच्या माध्यमातून अपेक्षित असलेल्या सर्व मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे यावर नाभिक समाज ठाम असल्याचे दिसते. नाभिक समाजाच्या या आंदोलनाबाबत राज्यकर्त्यांनी अर्थातच माननीय देवेंद्रजी फडवणीस साहेब यांनी पुढाकार घेऊन नाभिक समाजाला न्याय व त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा हीच अपेक्षा नाभिक समाजाची आहे. माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडवणीस साहेब तसेच माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब यांनी तातडीने ३० सप्टेंबरच्या आंदोलनाच्या अगोदर नाभिक समाजाच्या शिष्टमंडळाला प्रचारित करून मागण्या मान्य केल्यास नाभिक समाजाला न्याय मिळाल्याचे समाधान होईल. याकरिता नाभिक समाजाने एक विचाराने संघटित होऊन या संघर्ष लढ्यात सहभागी झाले पाहिजे कोण नेता कोण कार्यकर्ता यापेक्षा माझा समाज मोठा हे या आंदोलनातून दाखवून देणे गरजेचे आहे तेव्हा एक व्हा. संघटित रहा हीच अपेक्षा.
आपला हितचिंतक
भगवान बिडवे