टीम लोकमन मंगळवेढा |
पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी 130 कोटी रुपयांच्या दर्शन मंडप आणि स्कायवॉक आराखड्यास तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास शिखर समितीने मंजुरी दिली असून लवकरच या आराखड्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळेल. हा दर्शन मंडप उभा राहिल्यानंतर टोकन दर्शन सुविधा सुरु करण्यात येईल. 6 हजार भाविकांची सोय होणार आहे. अशी माहिती पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी दिली.
यासंदर्भात अधिक माहिती देताना आमदार आवताडे म्हणाले कि, तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीची मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थतीतीत बैठक संपन्न झाली. या बैठकीस पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री अनिल पाटील, मुख्य सचिव सुजाता सौनिक, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार समाधान आवताडे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचेसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेल्या दर्शन मंडप आणि स्कायवॉक आराखड्यास शिखर समितीने मंजुरी दिली. भाविकांची वाढती संख्या आणि दर्शन रांगेत सुविधा पुरवताना प्रशासनावर येणारा ताण लक्षात घेता या आराखड्यास तात्काळ मंजुरी द्यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यानुसार या शिखर समितीची बैठक झाली आणि 130 कोटींच्या विकास आराखड्यास मंजुरी मिळाली. यानंतर लवकरच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या आराखड्यास मंजुरी मिळेल आणि लवकरात लवकर पुढील कारवाई सुरु होईल.
या दर्शन मंडप आराखड्यात 16 हजार चौरस मीटरचा 2 मजली दर्शन मंडप, आणि दर्शन मंडप ते विठ्ठल मंदिर पूर्व प्रवेशद्वार असा 1050 मीटर्स लांबीचा स्काय वॉक, दर्शन मंडप वातानुकूलित, दर्शन मंडपास 6 लिफ्ट आणि 2 रॅम्प, सीसीटीव्ही, 30 पास स्कॅनींग काउंटर, हिरकणी कक्ष, उपहार गृह, वैद्यकीय सेवा, स्त्री, पुरुष आणि दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, प्रथमोपचार सुविधा, अग्निशमन यंत्रणा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असणार आहे.
भाविकांची गरज लक्षात घेता भविष्यात दर्शन मंडपाची क्षमता वाढवण्यात येणार आहे. 6 हजार भाविकांची क्षमता असली तरी आताच त्यात वाढ करून 10 हजार भाविकांची क्षमता वाढवावी अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे. या दर्शन मंडपाची देखभाल पंढरपूर नगरपालिका करणार आहे. असेही आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले.