माडग्याळ : नेताजी खरात
माडग्याळ ता. जत जि. सांगली येथे आजपासून मल्लिकार्जुन देवाची यात्रा भरण्यास सुरुवात झाली आहे. त्यानिमित्त यात्रा कमिटीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यात्रा कमिटीच्या वतीने देण्यात आली.
काल सायंकाळी श्रीचे वाजत गाजत आगमन झाले व जनावरांचा बाजार भरण्यास सुरुवात झाली. आज दिनांक २६ रोजी डोळळीन कन्नड गाणी या करमणुकीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक २७ एप्रिल रोजी खिलार जनावरांचे व माडग्याळ मेंढीचे तसेच शेतीमालाचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. रविवार दिनांक २८ एप्रिल रोजी डफाची गाणी हा करमणुकीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. सोमवार दिनांक २९ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता खिलार जनावरांचे, माडग्याळ मेंढी व शेतीमालांची निवड करून सकाळी १० वाजता बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. सायंकाळी ४ वाजता भव्य जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये १ नंबरच्या कुस्तीला ५१ हजार रुपयेचे बक्षीस व २ किलो चांदीची गदा यात्रा कमिटीकडून देण्यात येणार आहे. तसेच २ ते ५ नंबरसाठी अनुक्रमे ४१ हजार, ३१ हजार, २१ हजार, ११ हजार अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
माडग्याळ नगरीत राज्यस्तरावरील मैदान गाजवलेल्या महिला कुस्तीपटूंची कुस्ती आयोजित केली आहे. त्याचबरोबर भव्य असा मुलांचा मल्लखांब प्रात्यक्षिक कार्यक्रम व मुलीचा रोप मल्लखांब प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित केला आहे अशी माहिती यात्रा कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे.
जनावरांसाठी स्वच्छ व शुद्ध पाणी जागोजागी नळाला चावी बसवून उपलब्ध करून दिले आहे. त्याचबरोबर यात्रेमध्ये हॉटेल्स, लहान मुलांची खेळणीचे दुकाने, पाळणे इत्यादी स्टॉल दाखल झाले आहेत.