माडग्याळ : नेताजी खरात
उमदी तालुका जत येथील सर्वोदय शिक्षण संस्थेचे संस्थापक क्रांतिकारी कॉम्रेड कल्लाप्पाण्णा चन्नप्पा होर्ती यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त आज उमदी येथे मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती या शिबिराचे समन्वयक डॉक्टर रवींद्र हत्ताळी यांनी दिली.
शनिवार दिनांक 1 जून 2024 रोजी महात्मा विद्यामंदिर हायस्कूल व जुनिअर कॉलेज उमदी तालुका जत येथे सकाळी दहा पासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे शिबिर चालणार आहे. या शिबिरामध्ये हिमोग्लोबिन तपासणी, शुगर तपासणी, बालरोग, अस्थिरोग, स्त्रीरोग, त्वचारोग, मुळव्याध, नेत्र तपासणी, दंतरोग, ह्रदयरोग आदी आजारांवरील तपासणी मोफत केली जाणार आहे.
या शिबिरामध्ये मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध फिजिशियन डॉक्टर मनीष बसंतवाणी, सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ व गुडघे प्रत्यारोपण विशेषज्ञ डॉक्टर अरुणकुमार महिंद्रकर, सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर पुष्पांजली शिंदे, सुप्रसिद्ध बालरोग व नवजात शिशु तज्ञ महेश कोनल्ली, सुप्रसिद्ध त्वचारोग तज्ञ व कॉस्मेटोलॉजिस्ट डॉक्टर श्वेता होले पाटील, नेत्ररोग तज्ञ डॉक्टर ऋषिकेश आरळी, सुप्रसिद्ध जनरल सर्जन डॉक्टर अक्षय कायपुरे, सर्जन डॉक्टर गुरु बगली, दंतरोग तज्ञ डॉक्टर सादिक मिरजकर, डॉक्टर अक्षय चव्हाण आदी तज्ञ डॉक्टर्स शिबिरामध्ये उपस्थित राहून रुग्णांची मोफत तपासणी करणार आहेत.
होर्तीकर युथ फाऊंडेशन उमदी, मेडिकल असोसिएशन उमदी, प्राथमिक आरोग्य केंद्र उमदी, सर्वोदय परिवार व उमदी ग्रामस्थ यांच्या सौजन्याने हे शिबिर संपन्न होत आहे. या शिबिरामध्ये नामवंत तज्ञ डॉक्टर्स उपस्थित राहून तपासणी व मार्गदर्शन करणार आहेत तरी जास्तीत जास्त रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.