टीम लोकमन मंगळवेढा |
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सोलापूर जिल्ह्यातील वजनदार नेते उत्तमराव जानकर यांना लोकसभा निवडणुकीनंतर महत्त्वाचे स्थान मिळताना दिसत आहे. त्यासोबतच शरद पवार गटात त्यांचे वर्चस्व वाढत आहे. शरद पवार यांनी जानकरांवर आता आणखी महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
बारामती लोकसभा निवडणूक आणि त्यानंतरही कायमच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात भडक आणि बेधडक बोलणारे नेते म्हणून उत्तम जानकर यांची नवीन ओळख निर्माण झाली आहे. उत्तमराव जानकर यांना पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सातारा जिल्ह्यातील माण-खटाव आणि सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभा मतदार संघाकरिता विशेष निरीक्षक पदी नियुक्त करून त्यांच्यावरचा विश्वास अधिकच दृढ केला आहे.
नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या मान्यतेने उत्तमराव जानकर यांची माण- खटाव (सातारा) व मोहोळ (सोलापूर) विधानसभा मतदारसंघाच्या ‘विशेष निरीक्षक’ पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
उत्तमराव जानकर हे माढा लोकसभा मतदारसंघावर परिणाम करणारे माळशिरस तालुक्यातील धनगर समाजाचे महत्त्वाचे नेते आहेत. माढा लोकसभेत उत्तमराव जानकरांचा पाठिंबा कोणाला असतो यावर जय-पराजयाचे गणित अवलंबून असते असे म्हटले जाते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी उत्तम जानकरांसोबत बोलणी करण्याचा प्रयत्न केला होता. फडणवीसांनी त्यांच्यासाठी विशेष विमान पाठवून त्यांना नागपूरला बोलावून घेतले होते. मात्र ही सर्व शिष्टाई निष्फळ ठरली होती. अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडल्यानंतर उत्तम जानकर हे शरद पवारांसोबत राहिले.
माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांना विजयी करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. तीन दशकांपासूनचे मोहिते पाटील जानकर यांचे वैर या निवडणुकीत संपुष्टात आलेले दिसले आणि जानकरांनी धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करण्याचा जणू विडाच उचलला होता. उत्तम जानकर यांनी 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर माळशिरस विधानसभा लढवली होती. त्यावेळी त्यांनी भाजप उमेदवार राम सातपूतेंवर बनावट नोटा वाटल्याचा आरोप केला होता. यंदाही ते माळशिरसमधून भाजपला तगडे आव्हान देण्याची शक्यता आहे. त्याआधी शरद पवारांनी त्यांच्यावर दोन विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे.