टीम लोकमन मंगळवेढा |
बारामती लोकसभेच्या अटीतटीच्या निवडणुकीत सुप्रिया सुळेंनी वहिनी सुनेत्रा पवारांना पराभवाचा फुल्ल आहेर दिला. सून की लेक अशा पवार घरातील कौटुंबिक संघर्षात बारामतीकरांनी लेकीच्या बाजूने कौल दिला आणि सुप्रिया सुळेंनी विजयाचा चौकार लगावला.
आता निवडणूक जिंकल्यावर त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच शिंगावर घ्यायचे ठरवले आहे. निवडणूक काळात कार्यकर्त्यांना धमकावणे, ऐन मतदानाच्या दिवशी वेल्ह्यातील पीडीसीसी बँक 24 तास उघडी असणे, इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणेंची ताईंच्या कार्यकर्त्यांना दमदाटी, काम करा अन्यथा बघून घेऊ अशी अजितदादांची भाषा, मत दिले तरच निधी मिळेल, अशा अनेक तक्रारी अजित पवार आणि त्यांच्या पक्षाविरोधात आल्या. त्याचा हिशोब चुकता करायचा विडाच आता सुप्रिया सुळेंनी उचललेला दिसत आहे.
अजितदादांनी नाती बाजूला ठेवून राजकारणाचा खेळ खेळल्याने आता सुप्रिया सुळेही अजित पवारांच्या साम्राज्याला सुरुंग लावण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. अगदी दूध संघापासून ते ग्रामपंचायत, अगदी विधानसभा निवडणुकीत सुद्धा आपण शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण ताकदीने उतरणार अशी घोषणाच सुप्रिया सुळेंनी केली आहे.
अजितदादांचा विषय निघाला की, सुप्रिया सुळे थेट बोलणे टाळायच्या. मात्र आता त्यांनी पदर खोचून अजितदादांना आव्हान द्यायचे ठरवले आहे. बारामतीच्या खासदारकीवर डोळा ठेवणाऱ्या आणि त्यासाठी साम, दाम, दंड भेद वापरणाऱ्या आपल्याच दादाला बारामतीबाहेर काढण्याचा चंगच ताईंनी बांधल्याचे दिसतेय. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना धूळ चारत सुप्रिया सुळेंनी पुन्हा बाजी मारली. मात्र त्यांना डिवचल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत अजितदादांना आता सुप्रियाताईंशी दोन हात करावे लागणार हे मात्र नक्की. बारामतीत विजय झाल्यानंतर सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या आईची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. निवडून आल्यानंतर सुप्रिया सुळे बारामतीत आहेत. त्यावेळी त्यांनी भेटीगाठी घेताना अजित पवारांच्या आई आशाकाकींची देखील भेट घेतली.
दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला केंद्रीय मंत्रिमंडळात प्रत्येकी 1 मंत्रिपद दिले जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची भाजप नेतृत्वाशी चर्चा झाली असून त्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी 1 मंत्रिपद देण्याचं निश्चित झाले असल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे.