टीम लोकमन मंगळवेढा |
भारतात जातीव्यवस्थेची मूळं किती घट्ट रोवलेली आहेत. याची साक्ष देणारी घटना छत्रपती संभाजीनगरमधून समोर आली आहे. आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरूणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पुरोगामी महाराष्ट्रात घडलेल्या या घटनेने मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.
अमित साळुंखे आणि विद्या किर्तीशाही या दोघांनी प्रेमविवाह केला. सुखी संसाराची अनेक मोठी स्वप्न त्यांनी पाहिली. पण ही सगळी स्वप्न आता धुळीस मिळाली आहेत. कारण विद्याच्या कुटुंबियांनी अमितची हत्या केली आहे. या घटनेने केवळ छत्रपती संभाजीनगरच नव्हे तर अवघा महाराष्ट्र हादरला आहे.
विद्या आणि अमित… दोघेही एकाच गावचे… लहानपणापासून दोघेही एकत्र वाढले. पुढे या दोघांचे एकमेकांवर प्रेम जडले. विद्याच्या घरच्यांनी तिच्या लग्नासाठी मुलगा बघायला सुरुवात केली. पण या दोघांचेही एकमेकांवर जीवापाड प्रेम होते. म्हणून संस्कृती आणि विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात येत या दोघांनी लग्न केले. रजिस्टर मॅरेज केले. पण लग्नाला एक महिना होताच अमित साळुंखेची हत्या केली गेली अन् ती हत्यादेखील विद्याच्या भावानेच केली आहे.
अमितच्या हत्येवेळी नेमके काय झाले?
संध्याकाळच्या वेळी अमित पबजी गेम खेळत होता. इतक्यात गावातील मुलांनी पबजीवरच त्याला घराबाहेर बोलावून घेतले. अमित हातात मोबाईल घेत बाहेर गेला. घराजवळच्या झाडाखाली तो त्या मुलांसोबत जाऊन बसला. इतक्यात गावातली लाईट गेली अन् अमितवर सपासप वार झाले. क्षणार्धात अमितचा देह रत्नाने माखला. त्याच्या पोटात चाकूने वार केला गेला. त्याचे आतडेपण पोटाच्या बाहेर आले.
अमितचा आवाज घरच्यांना आला. त्याचा भाऊ पळत झाडाच्या दिशेने गेला. त्याने पाहिले तर अमित रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. अमितला दवाखान्यात नेण्यात आले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 14 जुलैला ही घटना घडली आहे. अमितची हत्या करणाऱ्या माझ्या भावाला आणि वडिलांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी विद्याने केली आहे.