मंगळवेढा : अभिजीत बने
माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी डावलल्याने मोहिते पाटलांनी भाजपला बाय-बाय करत पुन्हा शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. धैर्यशील मोहिते पाटलांचा तुतारी हातात घेण्याचा निर्णय पक्का झाला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उद्या सकाळी अकरा वाजता ‘शिवरत्न’ वर स्नेहभोजनासाठी दाखल होत आहेत.
कोणत्याही परिस्थितीत लोकसभा लढवायचीच असा निश्चय केलेले मोहिते पाटील भारतीय जनता पार्टी कडून माढा लोकसभेची उमेदवारी आपल्यालाच मिळणार या भोळ्या आशेवर होते. परंतु भारतीय जनता पार्टीने मोहिते पाटलांना डावलून पुन्हा एकदा रणजीतसिंह निंबाळकरांवर विश्वास दाखवला. यामुळे दुखावलेले मोहिते पाटील इरेला पेटले. कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव वाढला. कोणत्याही परिस्थितीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाकडूनच माढा लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी कार्यकर्त्यांचा खुप आग्रह होता. परंतु रणजीतसिंह मोहिते पाटील हे भारतीय जनता पार्टीचे विधान परिषद सदस्य असल्याने मोहिते पाटलांना निर्णय घेणे अवघड जात होते. यामुळेच धैर्यशील मोहिते पाटलांना तुतारी हाती घेण्यासाठी विलंब लागला. धैर्यशील मोहिते पाटलांचे चुलते बाळदादांनी आक्रमक पवित्रा घेत मोहिते पाटील कुटुंबाला शरद पवारांसोबत जाण्यास भाग पाडले.
मोहिते पाटलांनी अनेक हेलपाटे पवारांकडे घातले परंतु मुरब्बी पवारांनी मोहिते पाटलांना काही दिवस ताटकळत ठेवले. अखेर पवारांनी सहमती दर्शवल्यावर धैर्यशील मोहिते पाटलांचा तुतारी हातात घेण्याचा निर्णय पक्का झाला. त्यानंतर धैर्यशील मोहिते पाटलांनी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. आता धैर्यशील मोहिते पाटील माढा लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी अर्थात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार असणार आहेत. धैर्यशील मोहिते पाटलांना दिल्लीला पाठवण्यासाठी शरद पवारांनी सुद्धा आता डाव टाकले असून माढा लोकसभा मतदारसंघातील अनेक बडे नेते गळाला लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. माळशिरस तालुक्यातील मोहिते पाटलांचे पारंपारिक विरोधक असलेले व माळशिरस तालुक्यात मोठा दबदबा असलेले उत्तमराव जानकर यांना आपल्याकडे खेचण्यात यश मिळवले आहे. यामुळे उद्या उत्तमराव जानकर शिवरत्न वर मोहिते पाटलांच्या ताटाला ताट लावून शाही मेजवानीचा आस्वाद घेणार हे निश्चित आहे.
उद्या रविवार दिनांक १४ एप्रिल रोजी धैर्यशील मोहिते पाटील शिवरत्न बंगल्यावर सायंकाळी ४ सुमारास शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश करणार आहेत. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार व माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेसाठी खास स्नेहभोजन आयोजित केले आहे. यानिमित्ताने जिल्ह्यातील अनेक मातब्बर नेत्यांची मांदियाळी उद्या शिवरत्न वर असणार आहे. या स्नेहभोजनासाठी विधान परिषदेचे माजी सभापती फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर उपस्थित राहणार का याची मात्र सर्वांना उत्सुकता लागली आहे. रामराजेंचा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना टोकाचा विरोध आहे त्यामुळे रामराजे धैर्यशील मोहिते पाटलांना मदत करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. काहीही असो मात्र उद्याच्या डिनर डिप्लोमशीमध्ये जिल्ह्याच्या पुढील राजकारणाची दिशा ठरणार हे मात्र निश्चित आहे.