टीम लोकमन मंगळवेढा |
येत्या काही दिवसांवर येऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून तुतारी चिन्हावर निवडणूक लढण्यासाठी अनेकजण इच्छुक असतानाच ज्येष्ठ नेते शरद पवार हे प्रशांत परिचारक यांना गळाला लावण्यासाठी अकलूजमार्गे प्रयत्न करीत आहेत. मात्र प्रशांत परिचारक हे अजूनही ‘वेट आणि वॉच’च्याच भूमिकेत असलेले पाहायला मिळत आहे.
परिचारक यांच्या पांडुरंग परिवाराकडून तसेच पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील त्यांच्या समर्थकांकडून त्यांच्यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी दिवसेंदिवस मोठा दबाव वाढतच आहे. त्यामुळे महाराष्ट्र भाजपचे बिग बॉस असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले माजी आमदार प्रशांत परिचारक हे कार्यकर्त्यांचा आग्रह मान्य करणार की फडणवीसांवर असलेली निष्ठा जपत भारतीय जनता पार्टीतच राहणार याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिलेली आहे. यासंदर्भात अनेक तर्कवितर्क काढले जात असून त्यांच्या भूमिकीकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागून राहिले आहे.
भारतीय जनता पक्षाकडून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्यावर अन्याय होणार नाही. आपल्याला यावेळी पक्षाकडून नक्कीच उमेदवारी मिळेल असा दृढ विश्वास प्रशांत परिचारक यांना असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंगळवेढ्यातील कार्यक्रमाला दांडी मारलेले परिचारक हे अक्कलकोट येथील फडणवीसांच्या कार्यक्रमाला मात्र आवर्जून उपस्थित राहिल्याचे पहायला मिळाले.
प्रशांत परिचारक हे भारतीय जनता पार्टीत चांगलेच रमले असून त्यांचे मन अद्यापही भाजपमध्येच गुंतल्याचे दिसत आहे. त्यामुळेच त्यांना पक्षात घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून जोरदार प्रयत्न सुरु असतानाही परिचारक मात्र याला प्रतिसाद द्यायला तयार नसल्याची सद्यस्थिती पहायला मिळत आहे. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात सध्या भाजपचे समाधान आवताडे आमदार आहेत.
मागील पोटनिवडणुकीत प्रशांत परिचारक यांना थांबवून समाधान आवताडे यांना भारतीय जनता पार्टीकडून संधी देण्यात आली होती. विद्यमान आमदार असल्याने उमेदवारीसाठी आवताडे प्रबळ दावेदार आहेत. तर दुसरीकडे प्रशांत परिचारक हे आता थांबण्याच्या भूमिकेत नाहीत. त्यामुळे भाजपकडून कोणाला संधी दिली जाते यावरच पुढील राजकीय समीकरणे अवलंबून असणार आहेत. भाजपकडून आवताडे यांना पुन्हा संधी दिली तर प्रशांत परिचारक शांत राहतील असे चित्र सध्या तरी दिसत नाही. भाजपचा उमेदवार जाहीर झाल्यानंतरच परिचारकांची राजकीय भूमिका ठरणार असल्याचे दिसत आहे.
फडणवीसांच्या भूमिकेवर आवताडे आणि परिचारक यांची पुढील राजकीय गणिते अवलंबून…
समाधान आवताडे यांनी मतदारसंघात विकास कामांचा लावलेला झपाटा, आवताडे यांचेकडून मतदारसंघात वाढलेला विकास निधीचा ओघ आणि विकास कामांच्या उद्घाटनांचा सिलसिला पाहता भाजपमध्ये आवताडेंचेच पारडे जड राहील असे दिसत आहे. फडणवीसानी आवताडे यांना सढळ हाताने दिलेला विकास निधी पाहता आवताडेंवर फडणवीस यांची मर्जी असल्याचे जाणवत आहे. मात्र पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाची उमेदवारी देताना फडणवीस यांनी आवताडेंवर मर्जी बहाल केली तर परिचारकांना मात्र सध्याचा रंगमहाल सोडून जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही. असे झाल्यास कार्यकर्त्यांचा आग्रह मान्य करून शरद पवारांची तुतारी हाती घेऊन ‘राष्ट्रवादी पुन्हा’ म्हणत परिचारक मैदानात उतरणार का? विद्यमान आमदार समाधान आवताडे यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण करणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.