टीम लोकमन मंगळवेढा |
पुरोगामी व सुसंस्कृत महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासणारी एक घटना नुकतीच घडली असून बाणेर येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये महिलेवर सुपरवाझरने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित महिला हॉस्पिटलमध्ये हाऊसकिपींगचे काम करते.
याबाबत पीडित महिलेने सुरुवातीला हॉस्पिटलच्या सिक्युरीटी मॅनेजरकडे तक्रार केली होती. मात्र त्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही. यानंतर पुढे या महिलेने चतुः श्रृंगी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसांनी सोमनाथ लक्ष्मण बेनगुडे वय 42, राहणार. तळेगाव दाभाडे पिंपरी-चिंचवड याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.
सोमनाथ बेनगुडे हादेखील हाऊसकिपींग सुपरवाझर म्हणून हॉस्पिटलमध्ये काम करतो. याबाबत 29 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार जून 2024 रोजी हॉस्पिटलमधील रेडीएशन डिपार्टमेंटच्या चेंजिंग रूममध्ये घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर परिसरात हे हॉस्पिटल आहे. तेथे फिर्यादी महिला एका खासगी एजन्सीच्या माध्यमातून हाऊसकिपींगचे काम करते. तर आरोपी सोमनाथ बेनगुडे हादेखील सुपरवाझरचे काम करतो. फिर्यादी महिला ही तिच्या पतीपासून विभक्त राहते.
मागील चार वर्षांपासून त्या हॉस्पिटलमध्ये काम करते. 29 जून रोजी पीडित महिला नेहमीप्रमाणे कामावर आली होती. कामाची वेळ संपल्यानंतर ती हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावर खाली आली होती. या दिवशी तिला दुपारची शिफ्ट करण्यास सांगण्यात आले होते. तिला आरोपी बेनगुडे हा खाली भेटला. त्याने फिर्यादीला सांगितले की, रेडीएशन विभागात धूळ तशीच आहे. ती जाऊन साफ कर. त्यानुसार फिर्यादी रेडीएशन ओन्कोलॉजी विभागात काम करण्यासाठी गेली.
सायंकाळी सहाच्या सुमारास फिर्यादी बेनगुडे तेथे आला. त्याने विभागाचा दरवाजा बंद केला. यानंतर फिर्यादीला जबरदस्तीने चेंजिंग रुममध्ये ढकलले. फिर्यादी महिलेने त्याला विरोध केला. मात्र बेनगुडे याने तिच्यावर बलात्कार केला. झालेल्या प्रकारामुळे फिर्यादी घाबरुन रडू लागली. त्यावेळी बेनगुडे याने याबाबत कोणाला काही सांगितले तर तुला कामावर राहू देणार नाही. अशी धमकी दिली.
फिर्यादी घाबरुन घरी निघून गेली. दरम्यान, फिर्यादीवर कौटुंबिक जबाबदारी असल्यामुळे तिने याबाबत कोठे वाच्यता केली नव्हती. काही दिवसांनंतर तिने हॉस्पिटलच्या सिक्युरिटी मॅनेजरकडे तक्रार केली. त्यांनी फिर्यादीकडून तक्रार अर्जदेखील घेतला. मात्र पुढे काही झाले नाही असे फिर्यादीने म्हटले आहे. त्यानंतर तिने चतुः श्रृंगी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी आरोपी सुपरवाझर सोमनाथ बेनगुडे याला अटक केली.