टीम लोकमन मंगळवेढा |
पुण्यातील हडपसर परिसरात एका अल्पवयीन मुलीवर काका व चुलत भावाने लैंगिक अत्याचार केल्याचा, तर वडिलांनीही अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, पोलिसांकडून तक्रारीची पडताळणी केली जाणार आहे.
हडपसर पोलिस ठाण्यात १३ वर्षीय मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. त्यावरून काका, चुलत भाऊ व वडील यांच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक शोषण अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (पोस्को) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जुलै २०२२ ते जून २०२४ या कालावधीत घडला आहे.
पीडित मुलीचे आई, वडील आणि काका, चुलत भाऊ असे एकत्र कुटुंब हडपसर जवळील एका गावात वास्तव्यास आहे. हे कुटुंबीय परप्रांतीय आहे. जुलै २०२२ मुलीच्या चुलत भावाने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर भावाने तिला ठार मारण्याची धमकीही दिली होती. त्यामुळे मुलीने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही.
जानेवारी २०२४ मध्ये पीडित मुलीच्या काकानेही बलात्कार केला. त्यानंतर मुलीची आई काही कामानिमित्त गावी गेली असताना, तिच्या वडिलांनी ही तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी पीडित मुलीने वडिलांना विरोध केला असता त्यांनी तिला मारहाण केली होती. त्यानंतर मुलीने हा सर्व प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर तिच्या आईने पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.