टीम लोकमन मंगळवेढा |
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सांगली विभागातील पलूस आगाराचे वाहक दुशांत गंगाराम बुळे (वय ३४, रा. थांबूळ गवान, ता. जुन्नर, जि. पुणे. सध्या रा. कोयना वसाहत, पलूस) यांनी राहत्या घरी आत्महत्या केली. तिकीट तपासणी अधिकाऱ्याच्या खोट्या कारवाईमुळे आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी व चित्रफीत त्यांनी आत्महत्येपूर्वी तयार करुन ती व्हायरल केली आहे.
या संपूर्ण प्रकरणाची महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने गंभीर दखल घेतली असून तीन अधिकाऱ्यांवर एसटी प्रशासनाने तातडीने निलंबनची कारवाई केली आहे. सहायक वाहतूक निरीक्षक जयदेव भास्कर सांतुरकर, वाहतूक नियंत्रक हणमंत रामचंद्र खरमाटे आणि तपासणी पथकातील चालक मोहन विजय कल्याणकर अशी निलंबित अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
एसटी वाहक सुशांत बुळे यांच्या आरोपांची चित्रफीत सर्वत्र व्हायरल झाली आहे. शनिवारी रात्री नऊच्या सुमारास त्यांनी आत्महत्या केली. या संदर्भात त्यांचा भाऊ जालिंदर बुळे यांनी पलूस पोलिसांत फिर्याद दिली आहे. दुशांत हे शनिवारी सकाळी साडेआठ वाजता कराड ते जत बसमध्ये ड्युटीवर होते. ही बस तासगाव बसस्थानकात आली असता तिकीट तपासणी अधिकाऱ्यांनी तपासणी केली तेव्हा एका प्रवासी महिलेकडे अमृत योजनेचे चुकीचे तिकीट आढळले.
वाहक बुळे यांनी महिलेला अर्धे तिकीट व अन्य एका ज्येष्ठ नागरिक प्रवाशाला अमृत योजनेचे तिकीट दिले होते. त्या दोहोंनी तिकिटांची अदलाबदल केली होती. संबंधित ज्येष्ठ नागरिक अगोदरच्या थांब्यावर उतरून गेला. महिला प्रवाशाचे तिकीट त्याच्यासोबतच होते. तपासनीसांनी तिकिटे तपासली तेव्हा महिलेकडे अमृत योजनेचे तिकीट आढळले. त्यामुळे पथकाने कारवाईचा निर्णय घेतला.
बुळे यांनी मशिन तपासून कारवाई करा अशी विनंती पथकाला केली. मात्र तपासणी पथकातील अधिकाऱ्यांनी खोट्या प्रवाशाचे नाव टाकून कारवाई केल्याची तक्रार बुळे यांनी केली. निराश झालेल्या बुळे यांनी घरी गेल्यानंतर सायंकाळी चित्रफीत बनवली. कारवाईचा जाब विचारत एक चित्रफीत बनवून समाजमाध्यमांवर व्हायरल केली. खोटी कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना सोडू नका. असे त्यांनी चित्रफितीत म्हटले आहे. त्यानंतर दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तत्पूर्वी त्यांनी तपासणीच्या कार्यवाहीचे चित्रीकरण मोबाइलवर केले व स्टेटसला ठेवले होते. पोलिसांना पंचनाम्याच्या वेळी चिठ्ठीही सापडली.
…. आणि दोन वर्षाची चिमुकली झाली पोरकी, दोन निरागस मुलींचे वडिलांचे छत्रही हरपले
गेल्याच वर्षी वाहक दुशांत बुळे यांच्या पत्नीचे कर्करोगाने निधन झाले होते. या दाम्पत्याला सात आणि दोन वर्षे वयाच्या दोन लहान मुली आहेत. आईनंतर आता वडिलांचेही छत्र हरपल्याने या अतिशय कोवळ्या दोन निरागस मुली पोरक्या झाल्या आहेत. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आई-वडिलांचे छत्र हरपल्याने दोन निष्पाप मुलींवर जणू आभाळच कोसळले आहे. या घटनेने बुळे कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.