संतश्रेष्ठ श्री. संत सेना महाराज यांनी मध्ययुगीन काळात दिशाहीन मानव जातीला योग्य दिशा दाखविण्याचे कार्य आजीवन केले. समाज सुधारक, विचारवंत समजोउद्बोधक साहित्य रचनाकार असा त्यांचा नावलौकिक होता. समाजात मानवता व समानता प्रस्थापित व्हावी यासाठी त्यांनी अविरतपणे देशातील अनेक राज्यात जाऊन प्रचार प्रसाराचे कार्य केले. ते बहुभाषिक होते. त्यांना अनेक भाषा अवगत असल्याने, पंजाबी राजस्थानी हिंदी आणि मराठी भाषेत ते समाज प्रबोधन करून जनजागृती करीत असल्यामुळे त्यांना जनमान्यताही लाभली. श्री संत सेनाजींनी आपल्या ओजस्वी वाणीतून प्रभावीपणे कथा, भजन, कीर्तनातून समाजप्रबोधन करण्याबरोबरच विविध भाषेत आपल्या संतसाहित्याची निर्मिती केली.
श्री संत सेनाजी महाराज यांनी लोककल्याणासाठी महाराष्ट्रासह उत्तर भारतात भ्रमंती करून जनजागृती केली. त्यात पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या प्रांतात श्री संत सेनाजी महाराजांचा जन्मदिवसच ‘जयंती उत्सव’ म्हणून साजरा करण्यात येतो. तर, महाराष्ट्रात मात्र संत परंपरेनुसार संतश्रेष्ठ संत सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात येते. या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातील गावोगावी महिला भगिनीसह नाभिक समाज बांधव विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून श्री संत सेना महाराजांची पुण्यतिथी साजरी करतात.
श्री. संत सेना महाराज यांनी आपले संपूर्ण जीवन समाज जागृतीसाठी समर्पित केले होते. त्या काळी समाज जादूटोणा, मंत्रतंत्र आणि अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकला होता. बाबा बुवांच्या भोंदूगिरीमुळे समाजाचे शोषण आणि फसवणूक होत होती. मुळातच अशिक्षित आणि अडाणी असलेला बहुजन समाज, या प्रकारांना बळी पडत होता. त्यातच समाजामध्ये जातीय भेधभाव, अस्पृश्यता, उच्च-नीचता अशा वर्णव्यवस्थेच्या उतरंडीतून समाजात जातीय दरी निर्माण झाली होती. माणूस माणसाला जवळ करत नव्हता! त्यामुळे माणुसकीचा अर्थच हरवला होता. अनेक जाचक रूढी-परंपरा, रितीरिवाजांनी जणू माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकारच नाकारला होता. त्यामुळे समाजात नैराश्य, उद्दीग्नता, उदासीनता आली होती.
सामाजिक अन्याय-अत्याचाराने समाजमन दुःखी आणि कष्टी झाले होते. अशा या परिस्थितीत समाजमनाला खऱ्या अर्थाने मानसिक आधाराची नित्तांत गरज होती. मानवता, समता, आणि सामाजिक एकता समाजमनात रुजविण्याची गरज ओळखून श्री संत सेना महाराज आणि तत्कालीन संतांनी धार्मिकतेचा आधार घेऊन कथा, कीर्तन, भजन, भारूड, दोहे अशा विविध माध्यमातून समाज मनाला आधार देत, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक विशद करून अंधश्रद्धामुक्त करण्यासाठी समाजाला जागृत करण्याचे महान कार्य केले.
अंधश्रद्धा, जातीयवाद, उच्च-नीचता, आणि भेदाभेद म्हणजे समाजाला लागलेली कीड होय. ही कीड नाहीशी करून, समाजात समता आणि समानता रुजविण्यासाठी संतांनी आपल्या संत साहित्यातून आणि प्रबोधनातुन जगाला मानवतेचा संदेश देण्याचे महान कार्य केल. ईश्वर जर जगाचा आणि सृष्टीचा निर्माता आहे, तर आपण सर्व त्याचीच लेकरं आहोत. त्यामुळे परमेश्वराला सगळे समानच आहेत. म्हणूनच देवाकडे जातीय भेदाभेद, उच्च-नीचता, गरीब-श्रीमंत असा भेद असणारच कसा ? धर्मांधांनी, धर्माच्या ठेकेदारांनी स्वतःच्या स्वार्थासाठी आणि अस्तित्वासाठी, अनिष्ट रूढी-परंपरांसह जाती-जातींमध्ये भेदभाव, द्वोष पसरवून समाज मन दूषित करून परमेश्वरापासून मानवाला दूर करीत मंदिर प्रवेशासह ईश्वरभक्तीचा मार्गही बंद केला होता.
महाराष्ट्रात संतांचे विचार, कार्य आणि समाजप्रबोधनातून जनमानसाच्या मनाचा ठाव घेत तळागाळात पोहोचले. अनिष्ट आणि अन्यायकारक समाजविरोधी घटनांचा व घटकांचा संतसाहित्यातून परखडपणे विरोध करून वास्तव विचार जगासमोर मांडल्याने, सामाजिक दरी कमी होऊ लागली होती.
पंढरपूरच्या विठ्ठलाचे भक्त म्हणजेच ‘वारकरी’ हे दिंडीतून अनेकविध जाती, पंथांच्या लोकासमवेत, हजारोच्या संख्येने पांडुरंग भक्तीत तल्लीन होतात, जातीय भेदाभेदीच्या भिंती तोडून स्पृश्य अस्पृश्यतेला मूठमाती देऊन, पांडुरंगाच्या दर्शनासाठी समूहाने एकत्रितपणे आजतागायत सहभागी होत आहेत. भक्ती रसात न्हालेल्या. या ‘दिंडी सोहळ्यात’ जातपात, उच्चनीचता विसरून ‘माणसातच ईश्वर आहे’ या भावनेने गळाभेटी घेतात, एकमेकांच्या चरणी लागतात. हेच खरं संतांच्या कार्याचे प्रत्यक्ष उदाहरण होय. असे निश्चितपणे म्हणता येईल. संत साहित्याने लोकांच्या मनात नवा विचार आणि प्रकाश निर्माण केला होता. ‘वैदिक धर्मापेक्षा मानवतेचा धर्म हा अधिक महत्त्वाचा आहे,’ असा संदेश समाज मनापर्यंत पोहोचविण्यात संत यशस्वी झाले.
श्री. संत सेना महाराज हे संत परंपरेतील वैचारिक दृष्ट्या प्रगल्भ असे महान संत होते. देशाततील अनेक प्रांतात वर्षानुवर्ष भ्रमण केल्याने तेथील समाज व्यवस्था आणि सामाजिकस्थिती याचा अभ्यास श्री संत सेनाजी यांचा झाला होता.
अनुभवसिद्ध अभ्यासातून संत कालीन समाज व्यवस्थेतील अन्यायग्रस्त समाजाला आधार आणि दिशा मिळावी, त्याचे जीवन सुखी समाधानी आणि आनंदी व्हावे, यास्तव जनजागृती करून त्या दृष्टीने त्यांनी अविरतपणे समाज प्रबोधनाचे कार्य केले.
श्री. संत सेना महाराज यांचे गुरु रामानंदाचार्य यांनी विविध प्रांतातील जाती-समूहांचे शिष्यांना बरोबर घेऊन समाज जागृतीचा ध्वज उभारला होता. खरे तर हे बंडच होते. वैदिक परंपरेने धर्म आणि धर्माचं कार्य याची मक्तेदारी काही ठराविक लोकांकडे दिली होती. त्यांच्याशिवाय इतरांना धार्मिक नेतृत्व करता येणार नाही, असा दंडक होता. रामानंदाचार्यांनी हा दंडक मोडीत काढून अनंतानंद, सूरसुरानंद, सुखानंद, नरहरीयानंद, योगानंद, रोहिदास, पापा, तुळशीदास, कबीर, भावानंद, सेनाजी, धना, रामदास, पद्मावती आदी अशा एकूण चौदा शिष्यांना उपदेश देऊन जगाचा उद्धार करण्यासाठी पाठविले.
महाराष्ट्रात संत परंपरेनुसार संतांची पुण्यतिथी साजरी करण्यात येते. श्री संत सेना महाराज यांची पुण्यतिथी म्हणजे त्यांचा स्मृतिदिन, हा महाराष्ट्रात सर्वत्र विविध कार्यक्रम आणि उपक्रमांनी वर्षानुवर्ष नित्यनियमाने आयोजित करण्यात येतो. यानिमित्ताने अबाल वृद्धांसह महिला भगिनी व बांधव एकत्रित जमतात. याप्रसंगी कथा कीर्तनकार यांच्याद्वारे श्री संत सेना महाराज यांचे आचार, विचार, शिकवण आणि त्यांच्या कार्याची माहिती मिळते. या कार्यक्रमाचे औचित्य साधुन समाजातील अंधश्रद्धा, अनिष्टरूढी-परंपरा, आणि सामाजिक दृष्ट्या हानिकारक असलेले रितीरिवाज नष्ट करण्यासह अखिल नाभिक समाजाचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय विकास साधण्यासाठी सामाजिक वैचारिक एकता निर्माण करणे ही काळाची गरज ओळखून नाभिक समाज धुरीनांनी व कार्यकर्त्यांनी सामाजिक ऐक्य साधण्यासाठी श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सामाजिक ऐक्याचा संकल्प कल्यास श्री संत सेना महाराज यांना अभिप्रेत असलेल्या कार्याची उभारणी होईल. अशा या पवित्र कार्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील समाजबांधवांनी पुढाकार घेऊन समाज जागृती करावी.
लेखक
अंकुश भगवानराव बिडवे ९९६०१९८७३५