टीम लोकमन मंगळवेढा |
पंढरपुर व मोहोळ तालुक्याच्या राजकारणात दबदबा असलेल्या व खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वात कार्यरत असलेल्या भीमा परिवारात उभी फूट पडली आहे. लोकसभेप्रमाणेच भीमा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष व धनंजय महाडिक यांचे विश्वासू सहकारी सतीश जगताप यांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजू खरे यांना पाठिंबा दिला आहे.
भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि भीमा परिवाराचे प्रमुख धनंजय महाडिक यांनी दोन दिवसांपूर्वीच महायुतीच्या पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार समाधान आवताडे आणि मोहोळ विधानसभा मतदारसंघातील उमेदवार यशवंत माने या दोन्ही उमेदवारांना भीमा परिवाराचा जाहीर पाठिंबा दिला होता.
खासदार धनंजय महाडिक यांचा पंढरपूर तालुक्यात टाळकी सिकंदर येथे भीमा सहकारी साखर कारखाना आहे. या कारखान्याचे पंढरपूर आणि मोहोळ तालुक्यात कार्यक्षेत्र आहे. या परिसरात महाडिक यांच्या नेतृत्वाखाली भीमा परिवार कार्यरत आहे. हा भीमा परिवार विधानसभा निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावू शकतो त्यामुळे भीमा परिवार कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत दोनच दिवसांपूर्वी भीमा परिवाराची बैठक झाली होती. या बैठकीला मोहोळ आणि पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार यशवंत माने आणि आमदार समाधान आवताडे हे देखील उपस्थित होते. त्या बैठकीत पंढरपूर आणि मोहोळ मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर करण्यात आला होता. माने आणि आवताडे यांना निवडून आणण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला आहे.
भीमा परिवाराची बैठक होऊन दोन दिवस होत नाहीत तोच भीमा परिवारात उभी फूट पडली असून खासदार धनंजय महाडिक यांचे विश्वासू सहकारी व भीमा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सतीश जगताप यांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजू खरे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
भीमा कारखान्याचे उपाध्यक्ष जगताप यांच्या सोहाळे येथील निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे, महाविकास आघाडीचे उमेदवार राजू खरे यांच्यात बैठक झाली. यावेळी काखान्याचे संचालक अनिल कदम आणि महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीतही सतीश जगताप यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिला होता. जगताप यांनी नुसता पाठिंबा दिला नव्हता तर ते प्रत्यक्ष प्रणिती शिंदे यांच्या प्रचारातही सहभागी झाले होते. त्यामुळे भीमा परिवाराचे प्रमुख धनंजय महाडिक यांनी दोनच दिवसांपूर्वी महायुतीला पाठिंबा दिलेला असताना त्यांचे निकटवर्तीय असलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षांनी मात्र महाविकास आघाडीला आपला पाठिंबा दिला आहे.
मोहोळमध्ये महायुतीतही झालीय फाटाफूट
शिवसेनेचे (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट) जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांनी युती धर्माचे पालन करून आमदार यशवंत माने यांच्यासोबत राहणे अपेक्षित असताना त्यांनीही विरोधात भूमिका घेतली आहे. चवरे यांनी आपला पाठिंबा महाविकास आघाडीचे उमेदवार राजू खरे यांनाच दिला आहे. काही दिवसांपूर्वीच अजितदादांच्या राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनीही अजितदादा गटातून बाहेर पडत महाविकास आघाडीचे उमेदवार राजू खरे यांचा झंजावती प्रचार सुरु केला असून राजू खरे यांना आमदार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा निर्धारच त्यांनी केला आहे. त्यामुळे मोहोळ विधानसभा मतदारसंघात महायुतीतही फाटाफूट दिसून येत आहे.