मंगळवेढा : अभिजीत बने
नुकत्याच पार पडलेल्या सोलापूर लोकसभा निवडणुकीदरम्यान मंगळवेढा तालुक्यात कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या योग्य नियोजनामुळे निवडणूक कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली.
यावर्षीची लोकसभा निवडणूक अत्यंत चुरशीची आणि तुल्यबळ झाल्याचे पाहायला मिळाले. सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते या दोन युवा आमदारांमध्ये चुरशीची लढत झाली. या मतदारसंघातील निवडणूक ही भाजपसाठी प्रतिष्ठेची तर काँग्रेससाठी अस्तित्वाची निवडणूक होती. आतापर्यंतच्या सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या इतिहासातील ही निवडणूक अतिशय रंजक झालेली पाहायला मिळाले. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राम सातपुते यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भारतीय जनता पार्टीचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांचेसह राज्यातील व इतर राज्यातील भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांच्या सभा झाल्या. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या मतदारसंघात तळ ठोकला होता. पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे तर सोलापूर शहरातील प्रत्येक वार्डात फिरले. त्यांनी शहर मध्य मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले होते. देवेंद्र फडणवीसांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्याने त्यांनी या मतदारसंघावर पूर्ण लक्ष केंद्रित केले होते. काँग्रेसचे अतिशय वजनदार नेते असलेले राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री राहिलेले सुशीलकुमार शिंदे यांचा दोन वेळा या मतदारसंघात पराभव झाल्याने तो पराभव शिंदे परीवार आणि काँग्रेसच्या अतिशय जिव्हारी लागला होता. तो पराभवाचा कलंक पुसण्यासाठी आमदार प्रणिती शिंदे यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. प्रणिती शिंदे यांनी मोठी प्रचारात आघाडी घेतली होती. प्रणिती शिंदेंसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांच्या सभा झाल्या. या निवडणुकीत शरद पवारांसह विजयसिंह मोहिते पाटलांचे देखील बळ त्यांना मिळाले. एकूणच अतिशय चुरशीच्या आणि तुल्यबळ झालेल्या या निवडणुकीत मंगळवेढा पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि कार्यतत्परतेमुळे मंगळवेढा तालुक्यात संपूर्ण निवडणूक प्रक्रिया अतिशय शांततेत पार पडली.
मतदानाच्या दिवशी मंगळवेढा पोलिसांकडून संपूर्ण मंगळवेढा तालुक्यात चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. यामध्ये १ पोलीस उपअधीक्षक, ३ पोलीस निरीक्षक, २१ सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, ४६६ पोलीस कर्मचारी, २७८ होमगार्ड, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या ३ तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. मंगळवेढ्यातील इंग्लिश स्कूल येथे सर्वाधिक बूथ असल्याने त्या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांसोबतच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची १ तुकडी सुरक्षेसाठी कार्यरत होती.
सोलापूरचे जिल्हा पोलीस प्रमुख शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड, पोलीस उपअधीक्षक अर्जुन भोसले, यांचे मार्गदर्शनाखाली मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी चोख पोलीस बंदोबस्त लावला होता. स्वतः रणजीत माने सर्व प्रक्रियेवर नियंत्रण ठेवून होते. यामुळे तालुक्यात संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत आणि मतदाना दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. त्यामुळे मंगळवेढा पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.