टीम लोकमन मंगळवेढा |
पदवीधर शिक्षकांतून पदोन्नती मिळालेल्या शिक्षकांना वेतनवाढ देण्याचा निर्णय २६/९/२०२३ च्या निर्णयानुसार आदेश पारीत झालेल्या दिनांकापासून लागू करण्यात आलेला आहे . त्यामुळे सदरहू अर्हता दिनांकापूर्वी पदोन्नती मिळालेल्या शिक्षकांना आर्थिक लाभापासून वंचित रहावे लागले आहे . संबंधित पदोन्नतीधारक शिक्षकांना वेतनवाढीचा लाभ मिळावा अशी मागणी जिल्हा शिक्षक समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
पदवीधर वेतनश्रेणीमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांतून विस्ताराधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक म्हणून राज्यातील शिक्षकांना पदोन्नती मिळते. मात्र पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत शिक्षकांना वेतनवाढीचा लाभ मिळत नव्हता. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने राज्य शासनाकडे वारंवार पाठपुरावा करुन ही वेतन त्रुटी दूर करण्याची मागणी केली होती.
त्या अनुषंगाने ग्रामविकास विभागाने दि. २६ सप्टेंबर २०२३ च्या शासन निर्णयानुसार वेतन निश्चिती करताना वेतनवाढ देय केली. मात्र सदरचा आदेश त्या तारखेपासून पुढे लागू करण्यात आला. त्यामुळे त्या आदेशापूर्वी पदोन्नती मिळालेल्या शिक्षकांवर अन्याय झाला होता. ही बाब विचारात घेऊन सेवारत व या टप्प्यावर सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना न्याय मिळावा यासाठी शिक्षक समितीने राज्य स्तरावर पुन्हा पाठपुरावा केला. त्यामुळे दि. २० मार्च २०२४ रोजी ग्रामविकास विभागाने शासन निर्णय लागू झालेल्या दिनांकाऐवजी पदोन्नती मिळाल्याच्या तारखेपासून वेतनवाढ लागू करावी अशी सुधारणा प्रस्तावित केली आहे. त्यासंदर्भात विहीत नमुन्यात माहिती सादर करण्यासाठी सर्व जिल्हा परिषदांना सूचित केले आहे.
या पार्श्वभूमीवर शिक्षक समिती सोलापूर जिल्हा शाखेच्यावतीने सदरहू माहितीचे संकलन तात्काळ करुन माहिती राज्य शासनाकडे सादर करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष सुरेश पवार, ज्येष्ठ नेते दयानंद कवडे, पुणे विभागाचे उपाध्यक्ष मो.बा.शेख, शिक्षक समितीचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष विठ्ठलराव ताटे, गजानन लिगाडे, बसवराज गोरे, जाफर मुल्ला यांचेसह सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.