टीम लोकमन मंगळवेढा |
सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी आज भंडीशेगाव ता.पंढरपूर येथील पालखी श्री.संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील मुक्कामाच्या अनुषंगाने सर्व सुविधांची पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी भेट देऊन पाहणी केली.
यावेळी दिंडीमधील एक वृद्ध वारकरी दांम्पत्यामधील पत्नी आजारी आहे. तीला औषधगोळ्या सुरू आहेत. पण ताप कमी होईना म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे या आल्याचे पाहताच चांगल्या औषधोपचाराच्या मदतीच्या अपेक्षेने भेटण्यासाठी जवळ आले आणि माझी पत्नी आजारी आहे.
तीचा ताप कमी होईना अशी विनवणी केली असता त्यांनी तात्काळ आरोग्य विभागाच्या कर्मचारी यांना बोलावून घेतले आणि त्या माऊलीच्या अंगाला हात लावून काळजी करु नका औषधोपचाराने बरे होईल. असा धीर दिला आणि डॉक्टर यांना त्या माऊलीला अत्यंत काळजीपूर्वक औषधोपचार करा असे सांगितले आणि आरोग्य विभागाच्या कर्मचारी यांनी दक्षतेने औषधोपचार केले.
यावेळी सीईओ मनिषा आव्हाळे यांनी त्यांच्या कामाच्या एवढया धावपळीतही वेळ काढून दाखविलेली आत्मीयता व आपुलकी बद्दल वारकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. यानिमित्ताने सोलापूर जिल्ह्याला कार्यतत्पर व संवेदनशील महिला अधिकारी लाभल्याचे पाहायला मिळाले.