टीम लोकमन मंगळवेढा |
नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) संघटनेचा ७७ वा स्थापना दिवस १३ एप्रिल रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. निमा मंगळवेढा शाखेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निमाचे ज्येष्ठ सदस्य डॉ. सतीश गोखले यांच्या हस्ते धन्वंतरी पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी निमा मंगळवेढा शाखेचे अध्यक्ष डॉ. अतुल निकम होते.
नेत्रदान हे श्रेष्ठ दान हा संदेश मी समाजामध्ये पोहोचवण्यासाठी व समाजामध्ये नेत्रदानाप्रती जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूने निमा संघटनेच्या मंगळवेढा शाखेच्या सर्व सदस्यांनी नेत्रदान करण्याचा संकल्प केला.
यावेळी बोलताना मंगळवेढा निमा शाखेचे सचिव डॉ. सुभाष देशमुख म्हणाले, लोकांना उपदेश देऊन फक्त नेत्रदानाचे महत्त्व समजावून न सांगता पहिले स्वतः अमलात आणून निमा शाखा मंगळवेढा ने समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. या उपक्रमामुळे नक्कीच नेत्रदानाला चालना मिळेल आणि भविष्यात मोठ्या प्रमाणावर नेत्रदान होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. निमा वुमन्स फोरम मंगळवेढाच्या अध्यक्षा डॉ. प्रीती शिर्के यांनी अशा प्रकारे इतक्या मोठ्या प्रमाणात नेत्रदान करून एखाद्या संघटनेने आपल्या कृतीतून सामाजिक संदेश देण्याचा हा पहिलाच प्रयत्न असून त्यामुळे आपल्या शाखेचा आम्हा सर्वांना अभिमान वाटतो असे गौरवोद्गार काढले.
यावेळी निमा मंगळवेढा शाखेचे सदस्य डॉ. रामानुज मर्दा, डॉ. भीमराव पडवळे, डॉ. सिद्राम बरुकुल, डॉ. काशिनाथ वाले, डॉ. दत्तात्रय क्षीरसागर, डॉ. संतोष मेटकरी, डॉ. नितीन आसबे, डॉ. सुभाष देशमुख, डॉ. अभिजीत हजारे, डॉ. समाधान टकले, डॉ. महेश माळी, डॉ. प्रशांत नकाते, डॉ. कैलास नरळे, डॉ. राहुल लवटे, डॉ. गिरीष मासाळ आदी उपस्थित होते.